ठाकरे, पवार यांच्यामुळे राज्याचा विकास थांबला : चंद्रशेखर बावनकुळे

ठाकरे, पवार यांच्यामुळे राज्याचा विकास थांबला : चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षे झोपून राहिल्याने महाराष्ट्राला अडीच वर्षे मागे टाकण्याचे काम केले. पंतप्रधान मोदींनी प्रस्ताव मागूनही त्यांनी प्रस्ताव दिले नाहीत. प्रस्तावच न गेल्याने निधी मिळणार कसा, असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. ठाकरे यांना मोदी चालत नव्हते म्हणून ते शरद पवारांच्या घरी जाऊन बसले. ठाकरे व शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.

रत्नागिरीतील संपर्क ते समर्थन रॅलीत अनेकांनी पंतप्रधान मोदींना समर्थन दिल्याचेही त्यांनी स्वातंत्र्यवीर राणी लक्ष्मीबाई चौकात आयोजित कॉर्नर सभेत सांगितले. यावेळी त्यांच्यासह यात्रेचे प्रमुख विक्रांत पाटील, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, शैलेंद्र दळवी, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, उल्का विश्वासराव व महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी आदी व्यासपीठावर होते.

रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी बावनकुळे यांनी गुरुवारी जैन मंदिर व राम मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी संपर्क ते समर्थन अभियानांतर्गत शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांच्या भेटी-गाठी घेतल्या. अगदी दुकानातील कामगार, मालक, रस्त्यावरील फेरीवाले यांच्यासह मसाले विकणार्‍या महिलांचीही भेट घेऊन पुढील पंतप्रधान कोण म्हणून विचारले असता, त्यांनी मोदी म्हणून प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

या रॅलीनंतर कॉर्नर सभेत बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी, कोकण आणि महाराष्ट्राचा विकास करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला उव ठाकरे यांनी विरोध करीत पाप केले आणि शरद पवारांनी  त्यांना साथ दिली. परंतु इथले इथेच फेडावे लागते. त्यामुळे हिंदुत्वाच्या विरोधातल्या महाविकास आघाडीला लाथ मारत मर्दमराठा एकनाथ शिंदेंनी विकासाला साथ दिली. आता लढाई लोकसभेची असून, यावेळी विक्रमी खासदार निवडून येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

ही सभा सुरु असताना मोदी, मोदी अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी आ. बावनकुळे म्हणाले की, लोकसभेत आता 191 महिला खासदार तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला आमदार होणार आहेत. महिला आरक्षणाचा फायदा नारीशक्तीला होणार असून, पंतप्रधान मोदींनी नारीशक्तीला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. घरासोबत सध्या देशाचीही चावी नारीशक्तीकडे असून, त्यांनीही आपण कुठे कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्राकडून जे हवे ते घेऊन जा असे सांगितले होते. महाराष्ट्र क्रमांक 1चे राज्य बनवा, असेही सांगितले. परंतु अनेक वेळा सांगूनही ठाकरे ऐकले नाहीत तर त्यांनी शरद पवार यांचे ऐकले म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. सध्या प्रत्येक समाजातील, धर्मातील व्यक्ती मोदींचे नाव घेत आहेत, अगदी मुस्लीम महिलांचाही मोदींना पाठिंबा आहे. मोदींनी तलाक पध्दत बंद केल्याने, मुस्लिम महिलांनी विशेष अभिनंदन केल्याचेही त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. जानेवारीमध्ये मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पूर्वी मंदिर यही बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे, अशा घोषणा काँग्रेसवाले देऊन भाजपा कार्यकर्त्यांची टिंगळ करीत असत. परंतु, पंतप्रधान मोदींनी राम मंदिरचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे दर्शनासाठी येथील कार्यकर्त्यांनाही अयोध्येत नेण्यात येणार आहेत. 15 हजार कार्यकर्त्यांना रत्नागिरीतून अयोध्येला घेऊन जायचे आहे. एसी ट्रेनमधून या कार्यकर्त्यांना नेले जाणार असल्याचेही आ. बावनकुळे यांनी सांगितले. अल्पावधीत दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना, भर सभेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावर दावा नाही

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दावा केलेला नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील आणि महायुतीमधील 11 घटक पक्षांमधील जो कुणी उमेदवार देतील त्या उमेदवारासाठी भाजपचे वॉरियर्स प्रामाणिक काम करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news