Sonia Gandhi On Women's Reservation Bill | 'हे' विधेयक आमचेच! सोनिया गांधींचे नारीशक्ती वंदन विधेयकाला समर्थन

पुढारी ऑनलाईन डेस्क: महिला आरक्षण विधेयक हे राजीव गांधींचेच स्वप्न होते. त्यामुळे नारीशक्तीच्या समर्थनार्थ मी आज इथे उभी आहे. महिला आरक्षण विधेयक हे काँग्रेसचेच आहे, असे सांगत काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी आज (दि.२० सप्टेंबर) लोकसभेत ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ला समर्थन दिले. काँग्रेसच्या समर्थनार्थ आज सोनिया गांधी लोकसभेत बोलत होत्या. (Sonia Gandhi On Women’s Reservation Bill)
LIVE: Smt Sonia Gandhi ji speaks on the Women’s Reservation Bill in Parliament. https://t.co/5hvzwf9LL4
— Congress (@INCIndia) September 20, 2023
संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजचा तिसरा दिवस. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी चर्चेला सुरुवात केली. त्या म्हणाल्या स्त्रीने आपल्याला केवळ जन्म दिला नाही, तर तिने आपल्या अश्रू, रक्त आणि घाम गाळून आपल्याला विचार आणि समजून घेण्यास सक्षम बनवले आहे. महिलांच्या ताकदीचा आपण अंदाज लावू शकत नाही. ती हिमालयासारखी आहे. भारतीय स्त्री अत्यंत सक्षम आहे, असे म्हणत सोनिया गांधी यांनी या विधेयकाचे समर्थन केले. (Sonia Gandhi On Women’s Reservation Bill)
Sonia Gandhi On Women’s Reservation Bill: हा माझ्यासाठी हृदयस्पर्शी क्षण
माझ्या आयुष्यातील हा एक अतिशय हृदयस्पर्शी क्षण आहे. प्रथमच, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सहभागासाठी आरक्षण विधेयक राजीव गांधी यांनी मांडले. जे राज्यसभेत ७ मतांनी अपयशी ठरले. नंतर पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. राजीव गांधी यांचे अर्धेच स्वप्न पूर्ण झाले आहे, परंतु हे विधेयक मंजूर झाल्यास राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल, असे सोनिया गांधी लोकसभेत बोलताना सांगितले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी
मला एक प्रश्न विचारायचा आहे, देशातील महिला त्यांच्या राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत, पण अजून किती वर्षे वाट पाहावी लागणार? हे विधेयक तात्काळ लागू करण्यात यावे आणि त्यासोबतच जात जनगणनाही करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.