Eknath Shinde | शासन आपल्या दारीमुळे पोटदुखी झालेल्यांसाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ नवा उपक्रम; शिंदेंचा ठाकरेंना टोला | पुढारी

Eknath Shinde | शासन आपल्या दारीमुळे पोटदुखी झालेल्यांसाठी 'डॉक्टर आपल्या दारी' नवा उपक्रम; शिंदेंचा ठाकरेंना टोला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अडीच वर्षांच्या सत्ताकाळात घरात बसून सरकार चालविणार्‍यांनी आमच्यावर टीका करू नये. शासन आपल्या दारी येतं, अनेक लोकांना लाभ देतंय, हे पाहून अनेकांना पोटदुखी झाली आहे. या पोटदुखीवर इलाज करण्यासाठी लवकरच आम्ही डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू करणार आहोत. त्यात त्यांच्या पोटदुखीवरही इलाज होईल, असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पाचोरा येथील श्री एम एम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासनामार्फत प्राधान्य क्रमाने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती सांगून कृषी सन्मान योजना एक रुपयात पिक विमा कामगार कल्याणच्या योजनाचा उल्लेख केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सावंत, मंत्री अनिल पाटील, खा.उमेश पाटील आ.सुरेश भोळे आ.जयकुमार रावल, आ.मंगेश चव्हाण, आ.चिमणराव पाटील, आ.संजय सावकारे, आ.चंद्रकांत पाटील, आ.लता सोनवणे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आ. दिलीप वाघ, प्रांताधिकारी भूषण अहिरे, सुमित पाटील आदी उपस्थित होते.

५३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तालुकास्तरावर पहिल्यांदाच आयोजित शासन आपल्या दारी या आजच्या कार्यक्रमात ५३५ कोटी रुपयांच्या जनकल्याणकारी विकास कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच भडगाव शहरासाठी १३४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना व पाचोरा शहरासाठी ५५ कोटी रुपये निधीची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजुरी देण्यात येणार आहे.

टिकाकारांना कामातून देणार उत्तर : मुख्यमंत्री शिंदे

उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे केलेल्या टीकेच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही अशा प्रकारच्या टिकांना काम करून उत्तर देणारे आहोत.मात्र आम्ही अशा पोटदुखीवर बोलायला लागलो तर पाटणकर काढा घ्यावा लागेल असा टोला लगावला.

केळी, कापसावर प्रक्रिया उद्योगांसाठी प्रयत्न :  उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत आणि सर्वांत जास्त ठिबकचा वापर करणारा जळगाव जिल्हा आहे. केळी व कापसावर प्रक्रिया उद्योग येत्या काळात जिल्ह्यात उभे राहायला हवेत, यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तिन्ही मंत्र्यांसह आमदार-खासदारांचा प्रयत्न आहे. तिन्ही मंत्र्यांनी जिल्हावासियांना न्याय मिळवून द्यावा.एक रुपयात पीकविमा हा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. लोकांची कामे व्हावीत यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो, असे सांगत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही स्तुतिसुमने उधळली. मराठा आरक्षणावरही पवार यांनी भाष्य करीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय चर्चा झाली आहे. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू न देता न्याय तो देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button