Maharashtra Politics : शिव‘शक्ती’चा दरवळ | पुढारी

Maharashtra Politics : शिव‘शक्ती’चा दरवळ

– धनंजय लांबे, छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठांना इतिहासजमा करणार्‍या काही घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत, घडत आहेत. राज्याच्या राजकारणातील पहिली बंडखोरी 1978 मध्ये शरद पवार यांनी केली होती. अगदी वर्ष-दीड वर्षांपूर्वीपर्यंत त्या बंडखोरीचा हवाला देत शरद पवारांना दूषणे दिली जात होती. मात्र, त्यानंतर धक्कादायक म्हणाव्या अशा दोन घटना घडल्या आणि राज्यात कोण कुणाचा, हेच समजेनासे झाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विषय त्यांनी काढलेल्या शिवशक्ती यात्रेच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. पक्षाने तिकीट नाकारले, किंवा एखादे पद दिले नाही तरी पक्षांतर करणारे, नेतृत्वाविरुद्ध जाहीरपणे आकाश पाताळ एक करणारे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्राने पाहिले आहेत. मात्र, कितीही अन्याय झाला तरी पक्षात राहूनच संघर्ष करण्याचा स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा पुढे नेणार्‍या पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्या विरळ्याच. परळी या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा यांचे समर्थक, पक्षांतर्गत षड्यंत्रानुसार त्या हरल्या आणि धनंजय मुंडे विजयी झाले, असे मानू लागले. वास्तविक हा पराभव केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर बीड जिल्ह्याचे राजकारण जाणणार्‍या प्रत्येकाला एक धक्काच होता. त्यामुळे त्या नाराज झाल्या. मात्र ही नाराजी त्यावेळी त्यांनी व्यक्त केली नव्हती. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे आणि त्यांची मात्र उपेक्षा, हा अनुभव पदोपदी येत गेल्यानंतर त्यांची नाराजी लपून राहिली नाही. वास्तविक भाजपसारख्या बलदंड पक्षाकडे लोकनेत्यांची कमतरता आहे. पंकजा मराठवाड्यातीलच नव्हे, तर राज्यातील नाशिक, नगरसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तरीही त्यांना पक्षाने पदांपासून दूर ठेवले. मग ते विधान परिषद सदस्य असो की राज्यसभा. एरवी एखाद्या मातब्बर नेत्याला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तर विधानसभा किंवा तत्सम महत्त्वाचे पद त्याला दिले जाते. परंतु पंकजा यांची उपयुक्तताच नाकारली गेली. चिक्की घोटाळ्यासारख्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. जलयुक्त शिवार (1) योजनेचे कौतुक करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या सेल्फीवरूनही टीका-टिप्पणी करण्यात आली. त्यांच्या समर्थकांनी केलेल्या पक्षांतर्गत षड्यंत्राच्या दाव्यात तथ्य असेल, तर ते रचणार्‍यांनी आपल्याच पक्षाचा एक आमदार त्यामुळे कमी झाला, हे लक्षात घ्यावयास हवे होते. त्या पराभूत झाल्यानंतर जेव्हा त्यांना एकही महत्त्वाचे पद दिले गेले नाही, सतत डावलले गेले, तेव्हा पंकजा समर्थकांचा दावा खरा ठरला. त्यांची पक्षातील कोंडी पाहून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काल-परवा तर भारत राष्ट्र समितीनेही त्यांना ‘आॉफर’ दिली होती. परंतु त्यांनी ती धुडकावून लावली. त्यामुळे त्यांना भाजपशिवाय पर्याय नाही, असा पक्षनेतृत्वाचा समज झाला असावा. पंकजा ज्याचे प्रतिनिधित्व करतात, तो ओबीसी वर्ग राज्यातील बहुतांश विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमधील निकाल ठरवतो. त्यामुळे त्यांची उपयुक्तता नाकारणे पक्षासाठी फायद्याचे नाही, हे लक्षात येण्यासाठी आणखी एखादी निवडणूक होऊन जाऊ द्यावी लागेल.

या पार्श्वभूमीवर पंकजांनी जनसंपर्क द़ृढ करण्यासाठी श्रावणाचे औचित्य साधून शिवशक्ती यात्रा सुरू केली आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमधून जात असलेल्या या यात्रेत त्यांचे जागोजागी उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे . हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेत पक्षाचा झेंडा नाही. पंकजा ठरवतील तो निर्णय मान्य असणार्‍या कार्यकर्त्यांची ही गर्दी आहे. त्या त्या ठिकाणच्या भाजप नेत्यांनी मात्र या यात्रेपासून अंतर राखले आहे. त्यातच राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षण द्यावे, अशी मागणी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यानंतर ओबीसी घटकांमधूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, राजकाणातील अहंकार (इगो) भयंकर असतात. काहीही झाले तरी अमक्याला महत्त्व देणार नाही, या मानसिकतेमुळे राजकीय नुकसान झाले तरी विशिष्ट व्यक्तींपासून अंतर राखण्याचे प्रकार अनुभवास येतात. तेच सध्या महाराष्ट्रात घडत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आमदारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आणि पंकजांची कोंडी झाली आहे. त्या वेगळा मतदारसंघ निवडतात की, पक्षांतर्गत कोंडीमुळे वेगळीच वाट धरतात याबद्दल राज्याला उत्सुकता आहे. शिवशक्ती यात्रेतून त्यांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. राजकीय वजन वाढविण्यासाठी या यात्रेचा त्यांना निश्चितच उपयोग होईल.

Back to top button