एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळण्याची दाट शक्यता | पुढारी

एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळण्याची दाट शक्यता

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनात आता काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. कर्मचार्‍यांची मागणी रास्त असल्याने तिला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय एसटी कर्मचारी काँग्रेसने घेतला आहे. यामुळे राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या दीड वर्षपासून एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍याचे पगार रखडतात. परिणामी कर्मचार्‍यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. त्यातच महामंडळ आणि राज्य सरकारकडून वारंवार अपेक्षाभंग होत असल्याने वर्षभरात 31 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून विलीनीकरणाच्या लढ्यासाठी कर्मचार्‍यांनी दिलेले बलिदान आहे. यामुळे कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भावना सर्वसामान्य कर्मचार्‍यांची आहे.

मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना, एसटी कर्मचारी काँग्रेस आणि एसटी कामगार सेना या संयुक्त कृती समितीतील तीन प्रमुख संघटना आहेत. एसटी कर्मचारी काँग्रेसने संपकर्‍याच्या विलीनीकरणाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे,तर संपाबाबत मान्यताप्राप्त संघटनेने मौन बाळगले असून कामगार सेनेने संप मागे घ्यावा, असे आवाहन कर्मचार्‍यांना केले आहे.

संबंधित बातम्या

कोरोनामुळे एसटीला पूर्वीसारखे प्रवासी मिळणार नाहीत. कर्मचार्‍यांची आर्थिक स्थिती सुधारायची असल्यास विलीनीकरण करावेच लागेल. कर्मचार्‍यांच्या मागणीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील समर्थन दिल्याचे एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

शशांक राव यांच्या संघर्ष एसटी कामगार युनियनने आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करू नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनीदेखील कर्मचार्‍यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला.

आगारांचा बंद-सुरू लपंडाव

दिवाळीची गर्दी कॅश करता यावी याकरिता महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी बंद असलेले काही डेपो सुरू केले. मात्र या आंदोलनास काँग्रेसचे बळ मिळाल्याने सुरू असलेले डेपो पुन्हा बंद झाले. बंद असलेले डेपो सुरू होताच सुरू असलेले डेपो बंद पडत आहेत. यामुळे महामंडळासमोर नवा पेच निर्माण होत आहे.

एसटी कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कमी पगार व बोनस न मिळाल्याने कळवण येथील आगारातील एस.टी. कर्मचार्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. सुदैवाने या कर्मचार्‍याचा जीव वाचला असून, या घटनेमुळे येथील बस आगारात खळबळ उडाली आहे. एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, महागाई भत्त्यात वाढ करावी आदी मागण्यांसाठी येथील आगारातील कर्मचार्‍यांनी 29 ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून त्याची दखल घेतली गेली नसल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप आहे. कळवण आगाराचे चालक प्रमोद सूर्यवंशी (रा. वाजगाव, ता. देवळा) यांनी सोमवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Back to top button