पैशासाठी पडतोय नात्यांचा मुडदा; नातेवाईकांचे 400 हून अधिक दावे | पुढारी

पैशासाठी पडतोय नात्यांचा मुडदा; नातेवाईकांचे 400 हून अधिक दावे

सुनील कदम

कोल्हापूर : पैसा जशी दुनिया दाखवू शकतो, तसाच वेळ आल्यानंतर तो दुनियादारीसुद्धा दाखवून देऊ शकतो. याचाच प्रत्यय सध्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या निमित्ताने पावलोपावली येत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना मिळालेल्या 958 कोटी रुपयांपैकी 215 कोटी रुपये केवळ नातेवाईकांनी पैशाच्या लालसेपोटी वेगवेगळे दावे कोर्टात केल्याने अडकून पडले आहेत.

विकासाचा महामार्ग बांधताना मिळालेल्या नुकसानभरपाईवरून नात्यांचे मुडदे पडत असल्याचे द़ृश्य आत्मचिंतन करायला लावणारे आहे. मानवी नात्यांची वीण मूठभर पैशासाठी उसवत आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले तालुक्यांतील 49 गावांमधील 798.87 एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या या जमिनीला एकरी सरासरी एक कोटी 51 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जात आहे. मुळातच हा सगळा परिसर अल्पभूधारक शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे केवळ 798 एकर जमिनीचे तब्बल 12,006 हिस्सेदार आहेत. म्हणजे एकरी सरासरी 15 हिस्सेदार! नुकसानभरपाईच्या 1206 कोटी रुपयांवर या 12 हजार 6 हिस्सेदारांचा हक्क आहे. म्हणजे प्रत्येक हिस्सेदार सरासरी 9 ते 10 लाखांचा धनी होणार आहे. मात्र आता या नुकसानभरपाईच्या रकमेवरूनच महामार्गालगतच्या अनेक गावांमध्ये नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झालेला दिसत आहे.

प्रशासनाने आजपर्यंत यातून सामंजस्याने मार्ग काढून 958 कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप केलेले आहे. मात्र अजूनही जवळपास 215 कोटी रुपये संबंधित हिस्सेदारांच्या आणि खातेदारांच्या हेव्यादाव्यांमध्ये अडकून पडलेले आहेत. नुकसानभरपाईवर आपलाच हक्क असल्याचे किंवा आपलाही हक्क असल्याचे 405 दावे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले असून हे दावे निकालात काढण्याच्या कामात सध्या प्रशासन गुंतल्याचे दिसत आहे.

महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात सध्या प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जमिनींची कागदपत्रे अपूर्ण आहेत, कुणाच्या नोंदी व्यवस्थित झालेल्या नाहीत, नोंदीअभावी काही जमिनींवर अजूनही मूळ मालकाचेच नाव, काही जमिनींचे व्यवहार रीतसर झालेले नाहीत, काही जमिनींचे हिस्से आणि पोटहिस्से पडलेले नाहीत, अशा एक ना अनेक समस्या भरपाईचे वाटप करताना येत आहेत.

विशेष म्हणजे ही भरपाइची रक्कम आपल्याच किंवा आपल्याही पदरात पाडून घेण्यासाठी रक्ताच्या नात्यांमध्ये हमरीतुमरी सुरू असल्याचे अनेक किस्से बघायला मिळू लागले आहेत. आई आणि मुलगा, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, नणंद-भावजय, मामा-भाचे, जावई-मेहुणा, सासरा-जावई, सख्खे आणि सावत्र अशा नात्यांमध्ये कधी नव्हे इतके वितुष्ट निर्माण झालेले दिसत आहे. आजपर्यंत एकमेकांची आतुरतेने वाट पाहणारे नातेवाईक एकमेकांचे तोंड बघणेही टाळताना दिसत आहेत. एक-दोन गावांत तर नुकसान भरपाईच्या पैशाच्या वादातून दोघांचे मुडदेही पडले आहेत. हाणामारीच्या तर कित्येक घटना घडलेल्या आहेत. एकूणच विकासाच्या या महामार्गावर नुकसानभरपाईच्या पैशापायी मानवी नात्यांचा मात्र मुडदा पडताना दिसत आहे. नुकसानभरपाईचा पैसा आता संबंधित जमिनींच्या हिस्सेदारांना दुनियादारी दाखविताना दिसत आहे.

पैशांसाठी भाचाच उठलाय मामाच्या जीवावर!

शाहूवाडी तालुक्यातील एक छोटेसे गाव. या गावातील असेच एक भाऊ-बहिणीचे उदाहरण समोर आले आहे. बहिणीच्या तरुणपणीच तिचा नवरा वारल्याने मामानेच आपल्या तुटपुंज्या जमिनीत राब राब राबून तर कधी मोलमजुरी करून भाच्यांचा सांभाळ केला, लहानाचे मोठे केले. आपल्या संसाराला टाचकं पडली तरी बहिणीला कधी काही कमी पडू दिलं नाही. भाच्यांनाही चांगलं शिक्षण दिलं. आता भाच्यांना चांगले दिवस आले आहेत.

शहरात गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या लागल्या आहेत. सगळं कसं गोडीगुलाबीनं चाललंय. पण अचानक नुकसान भरपाईच्या पैशाचं निमित्त झालं आणि भाच्यांनी मामाबरोबर उभा दावा मांडला. वडिलोपार्जित जमिनीत आमच्या आईचाही हिस्सा मिळालाच पाहिजे म्हणून भाच्यांनी दोन-तीन वेळा मामाला ठोकून काढलंय. त्यामुळे सध्या हे प्रकरणही प्रशासनाच्या दरबारी दाखल झाले आहे.

 

Back to top button