रायगड जिल्‍ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर | पुढारी

रायगड जिल्‍ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर

रायगड; पुढारी वृत्तसेवा रायगड जिल्हा वातावरणीय बदल आणि मान्सूनच्या कचाट्यात चांगलाच सापडला आहे. गेल्‍या आठवडाभरापासून पावसाच्या ऑरेंज आणि रेड अलर्ट जिल्ह्यात जणू ठिय्या मारला आहे. सोमवारी 24 जुलैला जिल्हाधिकारी रायगड यांनी मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गत आठवड्यातील गुरुवार , शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस शाळांना पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रायगड यांनी सुट्टी जाहीर केली होती. जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्याने काही शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

रायगड जिल्ह्यात मान्सून उशिराने दाखल झाला. असे असले तरी पावसाने आपली सरासरी गाठली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जिल्ह्यावर वक्रदृष्टी ठेवली आहे. मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाट, कशेडी घाट, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आदी रस्त्यांवर दरडी कोसळून वाहतूक बंद झाली होती. काही ठिकाणी रस्त्यांवर असणाऱ्या पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. यामध्ये विशेष म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी घटना खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. यामुळे पावसाचे रौद्ररूप पाहता जिल्हाधिकारी रायगड यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस दरवर्षी कोसळतो. यंदा या पावसाच्या मुसळधार आणि सातत्यामध्ये खंड पडला नाही. यामुळे खोळंबणारी वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यासाठीच्या आदेशामध्ये दिरंगाई झाल्याने पहिल्या दोन दिवस शाळा, महाविद्यालये आणि पालकांची तारांबळ उडाली होती.

काही शाळांनी आता पहिल्या घटक चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दुसरीकडे परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची शिक्षकांची घाई आहे. यामध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सलग चार दिवस सुट्टी जाहीर झाली. यामुळे शाळांनी मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन तासिका घेण्याचे नियोजन केले आहे. संस्थांनी पालकांच्या मोबाईलवर आणि स्कुल ॲपवर ऑनलाईन तासिकांची लिंक टाकली आहे.

गुरुवार, शुक्रवार आदेश उशिराने पोहचल्याने सकाळ सत्रातील माध्यमिकचे वर्ग भरून सोडावे लागले. शनिवारी काही शाळांना सुट्टी असते, तर काही शाळा भरल्या जातात. त्यांना वेळेत समजल्याने पालकांची अडचण झाली नाही. मात्र सोमवारी मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शाळा नाही हा आदेश प्रशासनाने रात्री उशिराने काढला. त्यामुळे ज्या शाळांना आदेश प्राप्त झाले त्यांनी सुट्टी जाहीर केली. परंतु ज्या शाळांना आदेश उशिराने समजले त्यांनी शाळा भरण्याअगोदर 15 मिनिट आधी पालकांना काळविल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन परत यावे लागले.

हेही वाचा :  

Back to top button