Heavy rainfall : उत्तराखंड, हिमाचलमध्ये पुन्हा पावसाचा कहर; मुसळधार पावसाने मुंबईलाही झोडपले | पुढारी

Heavy rainfall : उत्तराखंड, हिमाचलमध्ये पुन्हा पावसाचा कहर; मुसळधार पावसाने मुंबईलाही झोडपले

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंड, गुजरातच्या काही भागांमध्ये आज (दि.२२ जुलै) मुसळधार तर मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने काल रात्री पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा एकदा जनजीवन ठप्प होण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट

संततधार पावसामुळे शुक्रवारी मुंबईतील रस्ते बंद, ट्रेन रद्द आणि शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली. दरम्यान मुंबईतील अनेक भागात पावसाचे पाणी शिरले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईला पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दर्शविली आहे. तसेच आजही मुंबई शहरासह उपनगराला पावसाने झोडपले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये संततधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागातील घरे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पूरस्थितीमुळे नांदेडमध्ये लोकांचे स्थलांतर

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील नांदेडमधील बिलोली तालुक्यातील १० हून अधिक गावांतील सुमारे 1,000 लोकांना पूरसदृश परिस्थितीमुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

  • ऋषिकेश-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग उत्तरकाशी जिल्ह्यातील धरसू बंधाऱ्याजवळ ढिगाऱ्यांमुळे बंद आहे.
  • गैरसैन जवळील कालीमाटी येथे रस्ता वाहून गेल्याने कर्णप्रयाग-गैरसैन राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
  • चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग नंदप्रयाग आणि बद्रीनाथ दरम्यान पाच ठिकाणी भूस्खलनामुळे ठप्प झाला आहे.
  • मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता.

बद्रीनाथ धामचा महामार्ग ठप्प

बद्रीनाथ महामार्गावरील लांबागड आणि कांचनगंगा या भागात संततधार आणि मुसळधार पावसामुळे कालवा फुटला आहे. यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाल्याने प्रमुख मार्ग विस्कळीत झाला असून, जनजीवन ठप्प झाले आहे.

हिमाचल प्रदेश आज ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि शनिवारी (दि.२२ जुलै) राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 23 ते 25 जुलै दरम्यान येथील चंबा, कांगडा, शिमला, कुल्लू, मंडी, बिलासपूर, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी (दि.२२ जुलै) उना, हमीरपूर, लाहौल आणि स्पिती, मी आणि कश्मीर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Back to top button