Irshalwadi Landslide Incident : डोंगर रात्री कोसळला; माहिती सकाळी मिळाली | पुढारी

Irshalwadi Landslide Incident : डोंगर रात्री कोसळला; माहिती सकाळी मिळाली

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  जे दोन वर्षांपूर्वी महाड येथील तळीये गावात घडले, त्याच घटनेची पुनरावृत्ती खालापूर येथील इर्शाळवाडी येथे घडली आहे. त्यावेळी दुर्घटना समजायला आणि प्रशासकीय मदत पोहोचायला सकाळ उजाडली होती आणि प्रशासकीय मदत उशिरा गेल्याने मृतांची संख्या वाढली होती. हीच पुनरावृत्ती इर्शाळवाडी येथे झाली आहे.

रायगड जिल्ह्यात दरडी कोसळण्याची भीती आहे. अलर्ट मिळाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न घेतल्याने नागरिक मृत्यूच्या खाईत लोटले गेले आहेत. मदतीसाठी नागरिक टाहो फोडत आहेत. मात्र, बचाव यंत्रणांना पोहोचण्यात मोठी अडचण होत असल्याने ढिगार्‍याखाली अडकलेल्यांची स्थिती गंभीर होत आहे.

महाडजवळच्या तळीये येथील दुर्घटना 23 जुलै 2021 रोजी मध्यरात्री घडली होती. बरोबर 2 वर्षांनंतर इर्शाळवाडीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तळीयेपेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. मात्र, डोंगर खाली येण्याचा प्रकार सारखाच आहे. या वाडीमध्ये 60 घरे होती. त्यातील 48 घरे दरडीखाली सापडली आहेत. 226 रहिवासी या ठिकाणी राहत होती. मध्यरात्री डोंगर कोसळण्याचा आवाज झाला व लोकांची पळापळ सुरू असतानाच प्रचंड डोंगर येऊन घरांवर कोसळला. यात अवघे 4 ते 5 लोक बाहेर येऊ शकले व संपूर्ण वाडीतील दोन घरे बचावली. आजही ढिगार्‍याखाली 80 ते 90 लोक अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने चालत हे ठिकाण गाठावे लागते. या सर्वाचा परिणाम बचाव कार्य करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि मुख्यमंत्रीसुद्धा पोहोचले आहेत. मात्र, जेसीबीसारख्या यंत्रणा पोहोचत नसल्याने बचावकार्य संथगतीने सुरू आहे. बाहेर जमलेल्या नातेवाईक आणि वाचलेल्या लोकांचा टाहो काळीज फाडून टाकतो. आमच्या माणसांना बाहेर काढा, त्यांना वाचवा, अशी विनंती ते प्रशासनाला करत होते.

Back to top button