Maharashtra Political Crisis : महायुतीची १२ जणांची समन्वय समिती स्थापन; बावनकुळे यांची घोषणा

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी १२ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली (Maharashtra Political Crisis)  आहे. या समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड असतील. त्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे समन्वय साधले जाईल, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.१३) भिवंडीत केली.

राज्यातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सामील झाल्याने महायुती मजबूत झाली आहे. परंतु, पहिल्याच दिवसापासून युतीत धुसफुस सुरू झाली (Maharashtra Political Crisis)  आहे. विशेष करून अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतल्याने शिवसेनेच्या काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता खातेवाटप आणि खातेबदल आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून वादाला तोंड फुटल्याने शपथविधी होऊनही खातेवाटप रखडले आहे. खातेवाटपावरून तिन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

अजित पवारांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे. शिंदे गटाने बंड करताना अजित पवारांना लक्ष्य केले होते. अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी निधी देण्यास दुजाभाव केला, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा अजित पवारांना अर्थ खाते देऊ नये, अशी शिंदे गटाच्या आमदारांनी भूमिका आहे.

तर रायगडाच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे महायुतीतील मतभेद उघड झाले होते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीत समन्वय राखण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.

महाराष्‍ट्रातील मंत्रीमंडळ विस्‍ताराला विलंब हाेत असल्‍याने माजी मंत्री बच्‍चू कडू नाराज असल्‍याची चर्चा हाेती. त्‍यानंतर बुधवारी यावर आपली नाराजी व्‍यक्‍त करत सरकारमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार सहभागी हाेण्‍याच्‍या मुद्यावर अप्रत्‍यक्ष टीकाही केली हाेती.  सत्ता, पैसा आणि पुन्‍हा सत्ता अशा बदलत्‍या राजकारणाला मी कंटाळलाे आहे. आता काेठे तरी या राजकारणाला स्‍थिरता येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

मला पदाची हाव नाही. मला कोणतेही पद नको आहे. मी एक सामान्‍य कार्यकर्ता म्‍हणूनच काम करणार आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मला नेहमीच पाठबळ राहिले. त्‍यांच्‍या काळात राज्‍यात दिव्‍यांग मंत्रालय सुरु झाले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी माझे काहीही देणेघेणे नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिव्‍यांग मंत्रालय सुरु केले यासाठी मी कायमस्‍वरुपी त्‍यांचा आभारी आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news