साडवली : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील प्रसिध्द असणाऱ्या आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरावर डोंगरातील भलामोठा दगड पडल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मंदिरातील गणपतीची मुर्ती सुरक्षित आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात गायमुख येथे गणपतीचे मंदिर असून हे मंदिर सुप्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातून भाविक व पर्यटक कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या मार्लेश्वर व गणपतीपुळे येथे दर्शनासाठी व तेथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरून येत असताना आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीचे दर्शन घेऊन ते पुढील प्रवास करीत असतात.
त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी कामानिमित्त जाणारे नागरिक किंवा वाहनचालक आंबा घाटातील गायमुख येथे थांबून गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीचे दर्शन घेऊन मार्गस्थ होत असतात. येथील गणपती मंदिरातील गणपती बाप्पा संकटमोचक असल्याची येथून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची श्रध्दा आहे. हे गणपतीचे मंदिर म्हणजे आंबा घाटाची एकप्रकारे शानच आहे. येथून जाणारे-येणारे वाहनचालक, प्रवाशी, भाविक गणपतीचे दर्शन घेवूनच पुढे जात असतात.
अशा या आंबा घाटातील सुप्रसिद्ध असणाऱ्या गणपती मंदिरावर पाठीमागे असणाऱ्या डोंगरावरील भलामोठा दगड पडल्याने मंदिराची मोठी हानी झाली आहे. विशेष म्हणजे मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला धक्का लागलेला नाही. शुक्रवारपासून सगळीकडेच जोरदार पाऊस कोसळत असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगरातील दगड खाली येऊन मंदिरावर कोसळला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :