जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील | पुढारी

जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

आमच्या मतांमुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात, अन् आम्हालाच नालायक म्हणतात. त्यामुळे थोडीफार तरी लाजशरम शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांना खासदार शिंदे यांच्या विषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी खासदार शिंदेंचे नाव ऐकताच राऊतांनी थुंकले होते. यावरून राज्याचे राजकारण तापलेले असताना राऊत यांच्‍या थुंकल्‍याच्‍या प्रकारावर पालकमंत्री पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, ज्या ४१ आमदारांनी राऊत यांना मतदान करून राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या नावाने हे थुंकताहेत. त्यामुळे राऊत यांना थोडी जरी लाज शरम असेल, तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा; अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.

मेंटल हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवली…

गुलाबराव पाटील म्हणाले, खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. म्हणजे कुणी कुणाला ‘थू’ केलं हे लक्षात येईल. वारंवार संजय राऊत कुणा ना कुणावर टीका करत असल्याने ठाण्यामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवली. गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्या कृत्यावरून त्यांची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे हे कळते.

Back to top button