Shashikant Shinde : तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे -फडणवीसांची युती तोडून दाखवतो: शशिकांत शिंदे यांचे आव्हान | पुढारी

Shashikant Shinde : तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे -फडणवीसांची युती तोडून दाखवतो: शशिकांत शिंदे यांचे आव्हान

विटा: पुढारी वृत्तसेवा: तुम्ही माझे घर फोडले, मी त्यांची युती तोडून दाखवतो, असे जाहीर आव्हान माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला आज (दि. ४) दिले. त्यांनी माझ्या भावाला पक्षात घेतले. त्यांनी माझे घर फोडले आहे, मी त्यांची युती फोडून दाखवतो, असे ते म्हणाले.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे बंधू आणि माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यावर आमदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आज विट्यात खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी आमदार शिंदे यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, वादळासमोर उभा राहण्यासाठी ताकद लागते. आज राष्ट्रवादीच्या प्रत्येक जिल्हयातील प्रमुख नेत्यांना टार्गेट केले जात आहे. सांगलीत जयंत पाटील, कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. मात्र, आम्ही घाबरणारे नाही आहोत. अधिकाराचा वापर करून दबावाचे राजकारण करण्यात येत आहे. भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला आहे. उद्या आपली सत्ता आल्यानंतर हे लोक पुन्हा आपल्याकडे येतील. आम्हालाही आमिषे दाखवली जात आहेत. मात्र, आम्ही दबावाला बळी पडत नाही.

यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत सदाभाऊ पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढले असते, तर आज ते आमदार म्हणून दिसले असते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मतभेद जरूर आहेत. मात्र, कोणतीही किंमत मोजून चारचे सहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.

माजी आमदार पाटील म्हणाले, दोन वेळा मी आमदार होतो, दोन वेळा पराभव झाला. आता पुढची निवडणूक योग्य वेळी, योग्य पद्धतीने लढवली जाईल. आज आटपाडी विसापूर सर्कलमध्ये पक्षाचे काय चालले आहे. आटपाडी सरळ करू शकला, तरच पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. अन्यथा अपेक्षा ठेवू नका, असा इशाराही माजी आमदार पाटील यांनी दिला.

हेही वाचा 

Rushikant Shinde: पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश; ऋषिकांत शिंदे यांचा खुलासा

राहुरी : भाजपचे हुकूमशाहीचे भूत जनताच उतरविणार : आ. प्राजक्त तनपुरे

सातारा : आ. शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढा : आ. रामराजे नाईक-निंबाळकर

Back to top button