Mahadevrao Jankar: पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार!’त्या’ वक्तव्यानंतर महादेवराव जानकरांची स्पष्टोक्ती | पुढारी

Mahadevrao Jankar: पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार!'त्या' वक्तव्यानंतर महादेवराव जानकरांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. अशात पंकजा भाजपच्याच नेत्या आहेत. त्या भाजप मध्येच राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे नेते आहेत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी गुरूवारी (दि.०१) दैनिक पुढारी सोबत बोलतांना दिली.

पंकजा मुंडे यांनी बुधवारी (दि.३१) रासपच्या वतीने दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ‘मी पक्षाची, पक्ष माझा नाही’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. परंतु, मुंडे यांच्यासाठी रासपचे दार सदैव उघडे आहेत असे जानकर म्हणाले.

दरम्यान,सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपकडून युतीचा प्रस्ताव आल्यास ५ लोकसभा जागांची मागणी पक्षाकडून करण्यात येईल. सांगली, परभणी, बारामती, माढा या जागांसाठी रासप आग्रही आहेत. या जागांवर भाजपने पक्षाला संधी दिली तर, युतीच्या अनुषंगाने चर्चा करता येईल. तूर्त युतीसंदर्भात प्रस्ताव नाही, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

पक्षाने ४८ लोकसभा मतदार संघ आणि २८८ विधानसभा मतदार संघात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे देखील ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरसह दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील जानकरांनी यावेळी स्पष्ट केले. राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राज्यात पक्ष एक-तृतीयांश जागेवर पक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे जानकर म्हणाले.

हेही वाचा:

 

Back to top button