धनगर समाजाला दरवर्षी 25 हजार घरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा | पुढारी

धनगर समाजाला दरवर्षी 25 हजार घरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जामखेड (नगर), पुढारी वृतसेवा: धनगर समाजासाठी दरवर्षी 25 हजार घरे देणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे समाजातील एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेे. जे जे आपल्या मनात ते ते सरकारच्या मनात आहे. ते करून देणार असल्याची ग्वाही देत फडणवीस म्हणाले, की पावसाळ्यात मेंढ्या चारण्याचा प्रश्न अनेक वर्षांचा होता. त्यासाठी राज्य सरकारने शेत आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.

विखेंना भाषणाची संधी नाही!

महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळाली नाही. प्रास्ताविक आमदार राम शिंदे यांनी केले, आमदार गोपीचंद पडळकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. परंतु विखे यांना बोलण्याची संधी न दिल्याने कार्यक्रमाचे संयोजक आमदार राम शिंदे व विखे यांचे अजूनही सख्य न झाल्याची चर्चा रंगली होती. पालकमंत्री विखे यांना शेवटी आभार मानण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. तेव्हाही आमदार पडळकर यांनी माईकचा ताबा घेत बारामतीच्या महाविद्यालयाच्या नामांतराची बातमी सांगितली. तोपर्यंत विखे पाटील तेथेच उभे होते. दरम्यान, अनेक आमदार खुच्यार्ंंअभावी उभे होतेच, शिवाय खासदार डॉ. सुजय विखे यांनाही बसण्यासाठी खुर्ची नसल्याचे दिसत होते. त्यामुळे अहमदनगरच्या आढावा बैठकीत खुर्ची नसल्याने आमदार राम शिंदे स्टेजवरून उतरून जात असल्याची आठवण लोकांमधून काढली जात होती.

आमदार गोपीचंद पडळकरांची क्रेझ

चौंडी येथे राज्यातून मोठ्या प्रमाणात धनगर समाज संख्येने येत असतो. त्यामुळे समाजामध्ये गोपीचंद पडळकर यांची क्रेझ असल्याचे दिसत होते. कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत ‘एकच छंद गोपीचंद‘ असा नारा दिला जात होता. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी घेतली आणि पडळकर यांना जवळ घेत लोकांना अभिवादन करण्यास सांगितले.

बारामतीच्या महाविद्यालयाचे नामांतर

बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी. त्याची तत्काळ दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करण्याची घोषणा दूरध्वनीद्वारे केली. ही माहिती पडळकर यांनीच आभार प्रदर्शनाच्या आधी मंचावरून दिली.

 

Back to top button