नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती | पुढारी

नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

कळवण हा आदिवासीबहुल भाग असून, दिवंगत मंत्री ए. टी. पवार यांनी आदिवासी जनतेची अडचण ओळखून शंभर खाटांच्या रुग्णालयाची या ठिकाणी निर्मिती केली आहे. आता केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोविड काळात ऑक्सिजनविना रुग्णांचे झालेले हाल ओळखून येथे सुधारणा करीत ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. या उपजिल्हा रुग्णालयात कळवण, सुरगाणा, सटाणा, देवळा, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातूनही आदिवासी, बिगर आदिवासी रुग्ण उपचारासाठी येत असतात. सध्या कळवण तालुक्यात सूर्य आग ओकत असून, उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. असे असताना रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने महिला रुग्णांचे हाल होत आहेत, तसेच पिण्यासाठीही पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर हॉटेल्स व मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. बाहेरील अस्वच्छ पाणी पिल्याने त्यांचे आजार बळावण्याची भीती नातेवाइकांना सतावत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील भोंगळ कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली आहे. चार दिवसांपासून येथील महिला कक्षातील स्वच्छतागृहात पाणीच येत नसल्याने महिलांचे हाल होत आहेत. तसेच येथे पिण्याच्या पाण्यासाठी बसविलेले फिल्टर मशीन पाण्याअभावी शोभेचे बाहुले बनले आहे. रुग्णालयाबाहेरून विकत अथवा मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागते आहे. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करावे. – दिगंबर आहेर, रुग्णाचे नातेवाईक.

हेही वाचा:

Back to top button