नाशिक : मनमाडला पावसाने झोडपले, वेचलेला कांदा भिजला | पुढारी

नाशिक : मनमाडला पावसाने झोडपले, वेचलेला कांदा भिजला

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

शहर परिसरासह ग्रामीण भागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर वादळी वारा आणि विजांचा कडकडाट करत दमदार पाऊस झाला. नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन पारा 41 ते 42 अंशांपर्यंत गेला होता. त्यामुळे जीवघेण्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र पावसाळा सुरू होण्याअगोदर मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी चांगली हजेरी लावली. दुपारी 3 च्या सुमारास मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट करीत पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाच्या हलक्याफुलक्या सरी पडल्या. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि जोरदार पावसाने एक तास झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची तारांबळ उडाली. खळ्यात व मळ्यात उघड्यावर नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अगोदरच कांद्याला भाव नाही. त्यात कांदा भिजून खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या लग्नसराई सुरू असून शहरासोबत ग्रामीण भागात विवाह सोहळे दणक्यात साजरे होत असताना पावसाने अचानक येऊन लग्न सोहळ्यात विघ्न आणले. पावसासोबत वादळी वाऱ्याने काही ठिकाणी मंडप उडून गेल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा:

Back to top button