प्रदेश काँग्रेसची कमान पुन्हा अशोक चव्हाणांकडे? | पुढारी

प्रदेश काँग्रेसची कमान पुन्हा अशोक चव्हाणांकडे?

मुंबई : दिलीप सपाटे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांचा समावेश कर्नाटक मंत्रिमंडळात झाल्याने त्यांच्या जागी नवा प्रभारी देण्यात येणार आहे. तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काँग्रेसने आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात केवळ एक जागा मिळाल्याने काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला होता. यावेळी काँग्रेसला राज्यातील कामगिरी सुधारण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी नजीकच्या काळात प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या आमदार नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. त्यांच्या काळात काँग्रेसने उत्तर कोल्हापूर आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली. बाजार समित्यांच्या निवडणुकीतही चांगली कामगिरी केली असली तरी पक्षाला आणखी बळकटी देणारा आणि सर्वांना मान्य होईल अशा नेतृत्वाकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. पटोले यांचे पक्षातील आणि खास करून विदर्भातील काही नेत्यांशी पटत नसल्यामुळे त्यांना बदलण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे होत आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पटोले यांचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेले मतभेदही उघड झाले होते.

सक्षम प्रचार यंत्रणेची कुवत हाही निकष

नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री सतेज पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यामध्ये चव्हाण यांचे पारडे जड मानले जात आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते. तसेच यापूर्वीही त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते काँग्रेसमधील जनाधार असलेले सर्वात मोठे नेते मानले जातात. शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश पातळीवर निवडणूक प्रचारयंत्रणा कोण चांगली राबवू शकतो, पक्षाला आर्थिक बळ देऊ शकतो, हेही पाहिले जात असून त्यात अशोक चव्हाण यांचे पारडे जड ठरण्याची शक्यता आहे.

Back to top button