नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक | पुढारी

नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मोहनपीर गल्लीतील सराफाची नजर चुकवून हातचलाखीने सुमारे सव्वासात लाख रुपयांच्या सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स पळविणार्‍या तीन बुरखाधारी महिलांना 12 तासांच्या आत पकडण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. त्या तिन्ही मालेगावातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चोरीचा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

छावणी पोलिस ठाण्यात अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची माहिती दिली. मंगळवारी (दि.23) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली होती. नटवरलाल शर्मा (55, रा. बुरुड गल्ली) हे आपल्या सराफ पेढीत असताना तीन बुरखाधारी महिल्या ग्राहक बनून आल्या. त्यांनी दागिने दाखविण्यास सांगितले. सोन्याच्या फुल्या पाहण्याच्या बहाण्याने, हातचलाखीने 152 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स त्या महिलांनी लंपास केला होता. हा प्रकार लक्षात येताच शर्मा यांनी किल्ला पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. त्याआधारे त्या महिलांची ओळख पटविण्यात आली. गुप्त बातमीदारांची मदत घेण्यात आली. तेव्हा साजेदाबानो ऊर्फ अन्नू बशीर खान (40, रा. एकबाल डाबी, कुसुंबा रोड), ताहेरा ऊर्फ आशिया खुर्शीद अहमद (25, रा. ताजपंजन चौक) व नाजिया शेख इस्माईल (30, रा. स. नं. 55, कौसिया कॉलनी) यांची नावे पुढे आली. त्यांच्या राहत्या घरात पोलिसांनी धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले. या संशयित गुन्हेगारांकडून सहा तोळे एक ग्रॅम वजनाच्या नाकातील सोन्याच्या फुल्या असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती भारती यांनी दिली. या गुन्ह्यात इतरही कुणाचा सहभाग होता का याचा पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button