मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर कंटेनरची ६ वाहनांना धडक, एक ठार, ५ जण जखमी | पुढारी

मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर कंटेनरची ६ वाहनांना धडक, एक ठार, ५ जण जखमी

खोपोली; पुढारी वृत्‍तसेवा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (सोमवार) रात्री एका कंटेनरचा भरधाव वेगात असतानाच ब्रेक निकामी झाला. या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरने सहा वाहनांना जबर धडक दिली. या विचित्र अपघातात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

या विषयी मिळालेल्‍या माहितीनुसार, 22 मे (सोमवारी) रात्री 11.15 च्या सुमारास मुंबई लेनवर कि.मी. 36/800 जवळ एक भरधाव वेगात प्रवास करणारा कंटेनर क्र. आर जे 19 जी एच-4497 चा पुणे ते मुंबई असा प्रवास करत असताना किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर ब्रेक फेल झाला. या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याच्या पुढे असणाऱ्या इको कार क्र एम एच – 03- डी ए – 8233, क्रेटा कार क्र. एम एच – 43- बी एन – 9114, टाटा जेस्ट कार क्र एम एच -14 – ई यु -352, हुंडाई कार क्र. एम एच -47- के – 6112, किया कार क्र.एम एच 03- इ बी -9777 आणि स्विफ्ट कार एम एच 02- बी एम – 9022 या वाहनांना धडक दिली.

कंटेनरची धडक एवढी जबरदस्त होती की, धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. अपघात झाल्याचे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि सामाजिक संस्थेची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठविण्यात आले. यात एकाचा हात तुटल्याने जास्त रक्तस्त्राव झाल्याने सुभाष पंढरीनाथ चौगुले (वय 45) राहणार वाशी, नवी मुंबई यांना उपचारासाठी नेताना त्‍यांचा मृत्यू झाला, तर जखमींमध्ये 1. चंद्रकला सुभाष चौगुले (वय 43), रा. वाशी 2. अमित कुमार श्रीहरिराम थठेर, (वय 30), रा. भांडुप 3. कौसर अली शाह, वय (40, रा. भांडुप) 4. आफताब समीउल्ला आलम, (वय 19, रा भांडुप) 5. अफसर अली मोहम्मद अली, (वय 36, रा. वडाळा) हे जखमी आहेत. यांना पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. यातील दोन जणांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते.

सदर कंटेनर चालक अपघाताच्या ठिकाणाहून पळून जात असताना बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले आहे.

अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहा. पो. नि. हरेश काळसेकर, पोलीस उपनिरक्षक आलोक खीसमतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह घटनास्‍थळी पोहचून घटनेची चौकशी सुरू केली. अपघात घडल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने उपाययोजना अवलंबत बाधित वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची दखल घेऊन खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्याचा आढावा घेतला. खोपोली नगरपालिका रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क करून योग्य उपचार देण्यासाठी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी निर्देश दिले होते. त्यामुळे प्राथमिक उपचार तातडीने होऊन जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात मदत झाली.

हेही वाचा : 

Back to top button