विखेंची भूमिका कायम पक्षविरोधी, भाजप आमदार राम शिंदे यांचा घणाघात; खदखद चव्हाट्यावर | पुढारी

विखेंची भूमिका कायम पक्षविरोधी, भाजप आमदार राम शिंदे यांचा घणाघात; खदखद चव्हाट्यावर

जामखेड (नगर), पुढारी वृतसेवा: जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुरुवातीपासूनच भाजप विरोधी भूमिका घेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संधान साधल्याचा थेट आरोप भाजपचेच माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी केल्याने जुन्या-नव्यांच्या वादाची खदखद चव्हाट्यावर आली. खासदार विखे यांचे स्वीय सहायकाच्या बंधूने तर तसंच एकनिष्ठ कार्यकर्त्याने सभापती पदाच्या निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेतली. राष्ट्रवादीसोबत संधान साधल्यामुळेच विखे पिता-पुत्र भाजप विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत, विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात काम करतात, याची प्रचिती आल्याचा घणाघात आ. शिंदे यांनी चढविला. विखे पिता-पुत्रांच्या विरोधात पक्ष प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.

नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांचा सत्कार चोंडी येथील निवासस्थानी केलनंतर आमदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपने विखे पिता-पुत्रांना खासदारकी, आमदारकीसोबतच राज्यात महत्वाचे मंत्रीपद दिले. तरीही विखे पिता-पुत्रांना अजून काय पाहिजे? असा प्रश्न आमदार राम शिंदे यांनी उपस्थित केला. भाजपने इतके देवूनही पिता-पुत्र पक्ष विरोधी कारवाई करत आहेत. गत विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष विरोधात केलेले काम विसरलो होतो. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत सहकार्य केले नाही. प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदापासून दूर ठेवणे कितपत योग्य?, असा सवाल करतानाच कार्यकर्त्यांना ताकत देण्याचे काम न करता त्यांना पदापासून दूर ठेवण्याचे काम विखे पिता-पुत्र करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.

जामखेड बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत विखे पिता-पुत्र मदत करू, असे वारंवार सांगत होते. परंतु सांगितल्याच्या विरोधात विखे यांनी भूमिका घेतली. भाजपकडे 9 संचालक होते. खासदार विखे यांच्या स्वीय सहायकाचे बंधू व एक निष्ठावान कार्यकर्ता अशा दोघा संचालकांची मते भाजप उमेदवाराला मिळाली नाहीत. ईश्वर चिठ्ठीचा कौल कामी आला. त्यामुळे कोणी, कितीही विरोध केला तरी ईश्वर आमच्या बरोबर असल्याचे आमदार शिंदे यावेळी सांगितले.

विखे-पवार एकत्रच

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व खासदार डॉ. सुजय विखे यांनी एकत्रीत जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनल केला. त्यामुळेच पवारांच्या पॅनलमधून खासदारांचे स्वीय सहायक व निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली. त्याअर्थी आमदार पवार व खासदार विखे हे एकत्र असल्याचा दावा आमदार राम शिंदे यांनी केला.

Back to top button