डी. एड्‌., बी. एड्‌. महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात ! | पुढारी

डी. एड्‌., बी. एड्‌. महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात !

गणेश खळदकर : 

पुणे : पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2030 पर्यंत या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बारावीनंतर डी. एड?्. आणि पदवीनंतर केवळ बी. एड्. अभ्यासक्रम शिकवणार्‍या महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

ए आणि त्यावरील नॅक दर्जा असलेल्या उच्च शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्षापासून इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्षात समावेश करावा, अशा सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने दिल्या आहेत. आयटीईपी हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे. विद्यार्थ्यांना बीए, बी.एस्सी. किंवा बी.कॉम. या शैक्षणिक अर्हतेसोबतच बी. एड्. ही व्यावसायिक अर्हता मिळविता येईल. यापूर्वी तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक बनण्यासाठी
लागणारी व्यावसायिक अर्हता मिळविण्यासाठी दोन वर्षांचा बी.एड्. कोर्स, असा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आयटीईपी हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना संबंधित उच्च शिक्षण संस्थांना दिल्या आहेत.फ

या अभ्यास-क्रमामुळे जे शिक्षक तयार होतील, त्यांच्याकडे अध्यापनाचे कौशल्य चांगले असणार आहे. शिक्षकांकडे पदव्या हव्याच; शिवाय त्या त्या वयोगटाचे मानसशास्त्र माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम 100 टक्के चांगला आहे. असाच एखादा अभ्यासक्रम पदवीस्तरावरील महाविद्यालयांसाठी करणे गरजेचे आहे. नेट, सेट किंवा पीएचडी झालेल्यांना शिकवता येतेच,
असे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठीही अभ्यासक्रम आवश्यक आहे.
                                                                – डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू

 

असा असेल अभ्यासक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमांची रचना पूर्वप्राथमिक ते दुसरी, त्यानंतर तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी आणि दहावी तसेच अकरावी आणि बारावी या चार स्तरांसाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक घडविले जाणार
आयटीईपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उच्च क्षमता मिळविलेला शिक्षक होणार

इंटिग्रेटेड अभ्यासक्रम तयार करावा लागेल
नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर चार वर्षांचा इंटिग्रेटेड बी. एड्. डिग्री कोर्स करावा लागणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचा डी. एड्. अभ्यासक्रम बंद होणार आहे. पदवीनंतर दोन वर्षांचा बी. एड्. अभ्यासक्रम बंद होऊन तो चार वर्षांचा इंटिग्रेटेड बी. एड्. अभ्यासक्रम होणार आहे. त्यामुळे बी. एड्. महाविद्यालयांना एकतर पदवी अभ्यासक्रम आणि बी. एड्. अभ्यासक्रम असा एकत्रित इंटिग्रेटेड बी. एड. अभ्यासक्रम तयार करावा लागेल; अन्यथा त्या महाविद्यालयांना टाळे लागणार असल्याचे स्पष्ट
झाले आहे.

Back to top button