

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या निकालावर विरोधक खोटं बोलत आहेत. न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचे भासवले जात आहे. ठाकरे गटाकडे शिल्लक राहिलेले कार्यकर्ते टिकवणे आणि सहानुभूती मिळवणे, यासाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाबरून राजीनामा दिला, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी (Shrikant Shinde On Uddhav Thackeray) आज (दि.१२) पत्रकार परिषदेत केला.
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde On Uddhav Thackeray) म्हणाले की, न्यायालयाच्या निकालावरून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. काही लोकांना हवेत बोलण्याची सवय आहे. रोज सकाळी मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची संस्कृती खराब करणाऱ्या संजय राऊत यांच्याबद्दल बोलून माझे तोंड खराब करण्याची माझी इच्छा नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत आहे. परंतु, काही लोकांना हवेत बोलण्याची सवय असल्याने ते न्यायालयाच्या निकालावरून दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या लोकांना थांबवून घेण्यासाठी ते खोटं बोलत आहेत. राज्यात घटनात्मक सरकार स्थापन झाले आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला तर न्यायालयात जाणार यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की, त्यांच्याकडे आता काही काम नाही. त्यामुळे ते न्यायालयात जाणार असतील. त्यांना निवडणुकीची इतकी घाई झाली असेल, तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या १४ आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे आणि जनता कोणाच्या बाजूने आहे हे सिद्ध करावे, असे आव्हानही शिंदे यांनी यावेळी दिले. त्यांच्याकडे असलेले आमदार शिवसेना आणि भाजपच्या आघाडीतून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आधी नैतिकता असेल, तर राजीनामा द्यावा, असेही शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याचे उद्धव ठाकरे यांना सहन झालेले नाही. त्यामुळे ते नैतिकतेची भाषा करत आहेत. तर त्यांच्याकडे खरीच नैतिकता असेल, त्यांच्याकडे असलेल्या १४ आमदारांनी राजीनामा द्यावा, असे आमदार संजय शिरसाट यावेळी म्हणाले.
हेही वाचा