किल्ले रायगडावर आता रहा खुशाल | पुढारी

किल्ले रायगडावर आता रहा खुशाल

नाते; इलियास ढोकले :  आगामी जून महिन्यामध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर तसेच किल्ला परिसरात रायगड प्राधिकरण व केंद्रीय पुरातत्त्व विभागामार्फत संवर्धनाचे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यामार्फत इमारतींचे नूतनीकरण केले जात असून या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या दोन डॉरमेट्रीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून सुमारे दोन हजार शिवभक्तांची निवासाची व्यवस्था येथे होऊ शकणार आहे. मे २०२३ अखेर ही सेवा सूरु होणार असल्याची माहिती किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अभियंता स्वप्नील बुर्ले यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.

अतिवृष्टी, वादळे अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये एमटीडीसीच्या किल्ले रायगडावरील या इमारतींचे गेल्या अनेक वर्षापासून मोठे नुकसान झाल्याने, त्या नादुरुस्त झाल्या होत्या. यामध्ये आता रायगड प्राधिकरण व एमटीडीसीच्या कार्यालयांकरिता स्वतंत्र इमारती निर्माण केल्या असून उर्वरित जागेमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे या दोन डोरमेट्री करण्यात आल्या आहेत.

किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्था या दोन डॉरमेट्रीमध्ये होणार असून शिवभक्तांना या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून आपली जागा सुनिश्चित करता येणार आहे. एमटीडीसीमार्फत गेल्या अनेक वर्षापासून महाडमध्ये देखील विविध ठिकाणी फार्म हाऊस तसेच हॉटेलमध्ये शिवभक्त व पर्यटकांकरिता सुविधा विकसीत करुन दिल्या आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्रातून शिवभक्तांना होत आहे.

किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी एमटीडीसीमार्फत सुरू होणारी ही डॉरमेट्रीची निवास सुविधा येत्या मे अखेर पूर्ण होणार असल्याने शिवभक्तांची फार मोठी सोय होणार असून शिवभक्तांकडून एमटीडीसीचे आभार मानण्यात येत आहेत.

 

Back to top button