नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस | पुढारी

नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाच्या ढिलाईमुळे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या मदतीची आस लागून असलेल्या बाधित शेतकर्‍यांच्या पदरी निराशा ओढावली आहे.

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला आहे. चालू महिन्यातही जिल्ह्यातील एक-दोन तालुके वगळता उर्वरित सर्व भागाला गारपीट व पावसाने तडाखा दिला आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विविध नेत्यांनी अवकाळीग्रस्त भागांचे दौरे करत शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. शासनाने पीक पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणांना दिले. त्यामुळे पंचनामे तातडीने पूर्ण होऊन शासनाची मदत हाती मिळेल, अशी बाधित शेतकर्‍यांना आशा होती. मात्र, अवकाळीला आठवडा उलटला तरी अजूनही पंचनामे सुरूच आहेत. नुकसानीची अंतिम आकडेवारी हाती येण्यासाठी आणखीन काही कालावधी जाईल, असे समजते आहे. परिणामी अगोदरच निसर्गाचा मारा झेलणार्‍या शेतकर्‍यांना प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा:

Back to top button