Kakadiche unde : उन्हाळ्यात पिकलेल्या काकडीपासून बनवा चविष्ट वाळूक उंडे | पुढारी

Kakadiche unde : उन्हाळ्यात पिकलेल्या काकडीपासून बनवा चविष्ट वाळूक उंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांचा कल शीतपेयांसोबत काकडी, गाजर, मठ्ठा, मसाले ताक, लस्सी या पदार्थाकडे कल वाढला आहे. प्रत्येकाला आजकाल गार असणारी काकडी किंवा वाळूक विकत घेण्याचा आग्रह केला जातो. मग बाजारातून घरी आणलेल्या काकडीचे सॅलेड बनवून सेवन केले जाते. यासाठी छोट्या काकडीचा खूपच वापर केला जातो. परंतु, ग्राहक बाजारात पिकलेल्या किंवा मोठी झालेल्या काकडी विकत घेत नाहीत. त्याच्याकडे पाठ फिरवतात किंवा काही वेळा बाजारातून आणलेली काकडी घरातच पिकली जाते. अशावेळी काकडी बाद झाली म्हणून फेकून दिली जाते. मात्र, पिकलेली काकडी फेकून न देता त्यापासून चविष्ट असे काकडीचे उंडे बनविले तर. चला मग पाहूयात ते कसे बनवायचे… ( Kakadiche unde )

साहित्य-

पिकलेली काकडी – एक
तांदळाचे पीठ- अर्धा किलो
गुळ- एक वाटी
वेलदोडे- एक चमचा

कृती-

१. पहिल्यांदा पिकलेली काकडी किंवा वाळूक घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

२. धुतलेल्या काकडी कट करून त्यामधील आत असणाऱ्या सर्व बिया काढून टाकाव्यात.

३. यानंतर काकडी किसणीने किसून घ्यावी आणि त्याच्यावरचे साल बाजूला काढून टाकावे.

४. एका कढाईत किसलेली काकडी गॅसवर ठेवून त्यात एक वाटी गुळ घालावा.

५. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवावे. यात एक चमचा वेलदोडे पावडर घालावी.

६. या मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर ते थंड होण्यास गॅसवरून खाली उतरून ठेवावे.

७. यानंतर यात थोडे- थोडे करून तांदळाचे पीठ घालून मळून घ्यावे.

८. मळताना चवीनुसार मीठ आणि आवश्यक तेवढे गार पाणी घातले तर चालते.

९. यानंतर फणसाची पाने किंवा कोणतीही छोटी असणारी पाने आणून ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. (पाने फार छोटी किंवा मोठी असू नयेत तर मध्यम आकाराची असावीत.)

१०. फणसाची आतील भागांच्या पानांवर एकसारखे मळलेले थोडे- थोडे पीठ संपूर्ण पानांला लावून घ्यावे.

११. यानंतर दुसरे एक फणसाचे पान त्यावर ठेवून ते बाजूला ठेवावे. असे सर्व पीठ पानांना लावून ध्यावे.

१२. यानंतर दुसऱ्या एका भांड्यात पाणी घालून त्यावर उकडीची चाळण ठेवावी.

१३. पाणी गरम होऊन वाफा आल्यावर चाळणीवर थोडे- थोडे करून फणसाचे पान शिजवण्यास ठेवावी.

१४. १५ ते २० मिनिटांनी तयार झालेली उंडे ताटात काढून त्याच्यावरील फणसाची पाने काढून टाकावीत.

१५. तयार झालेली चविष्ट काकडीचे उंडे सकाळी चहासोबत सेवन करावे. (Kakadiche unde )

हेही वाचा : 

Back to top button