पुढारी ऑनलाईन : सुदान आणि दक्षिण सुदान दरम्यान असलेल्या अबेई या तेल समृद्ध प्रदेशात हल्लेखोरांनी गावकऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैनिकांसह किमान ५२ लोक ठार झाले आहेत. तर ६४ जखमी झाले आहेत, अशी माहिती एका प्रादेशिक अधिकाऱ्याने दिली आहे. रविवारी ही घटना घडली आहे. (Sudan Abyei Clash)
या हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण सीमेवरील जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा संशय आहे, असे अबेईचे माहिती मंत्री बुलिस कोच यांनी असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेशी अबेईतून दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
या प्रदेशात प्राणघातक वांशिक हिंसाचाराच्या घटना नवीन नाहीत. येथील शेजारच्या वॉरप राज्यातील ट्विक डिंका आदिवासी लोकांचा अबेई येथील एनगोक डिंका यांच्याशी सीमेवर असलेल्या अनीत भागातील जमिनीवरून वाद सुरु आहे. अबेई येथे झालेल्या हिंसाचारात न्युअर जमातीतील तरुणच सशस्त्र हल्लेखोर होते. जे त्यांच्या भागात पूर आल्याने गेल्या वर्षी वॉरप राज्यात स्थलांतरित झाले होते, असे कोच म्हणाले.
युनायटेड नेशन्स इंटरिम सिक्युरिटी फोर्स फॉर अबेई (UNISFA) ने जारी केलेल्या एका निवेदनात, हिंसाचारात शांतता सैनिकांचा बळी गेल्याचा घटनेचा निषेध केला आहे. UNIFSA ने पुष्टी केली की आंतरजातीय हिंसाचार नियंकुआक, मजबोंग आणि खादियान भागात घडला. ज्यामुळे मोठी जीवितहानी झाली आणि नागरिकांना UNISFA तळांवर हलवण्यात आले. "अगोक येथील युनायटेड नेशन्स इंटरिम सिक्युरिटी फोर्स फॉर अबेई तळावर सशस्त्र गटाने हल्ला केला. हा हल्ला मिशनने परतवून लावला. पण एक घानाचा शांतीदूत त्यात मारला गेला. ही दुःखद घटना आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
सुदान आणि दक्षिण सुदानमध्ये २००५ च्या शांतता करारानंतर सुदानच्या उत्तर आणि दक्षिणेमध्ये अनेक दशके चाललेले गृहयुद्ध संपुष्टात आले. पण अबेई प्रदेशावरील कोणाचे नियंत्रण? यावरुन मतभेद कायम आहेत. सुदान आणि दक्षिण सुदान हे दोघेही अबेईवर आपली मालकी असल्याचा दावा करत आहेत. २०११ मध्ये सुदानपासून दक्षिण सुदान स्वतंत्र झाल्यानंतरही या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या प्रदेशातील बहुसंख्याक नगोक डिंका (Ngok Dinka) लोक दक्षिण सुदानला पसंती देतात, तर अबेई येथे गुरांसाठी चाऱ्याच्या शोधात येणारे मिसेरिया जमातीमधील लोक हे सुदानच्या बाजूने आहेत. सध्या हा प्रदेश दक्षिण सुदानच्या ताब्यात आहे. गेल्या मार्चमध्ये दक्षिण सुदानने अबेई येथे त्यांचे सैन्य तैनात केल्यानंतर आंतरजातीय आणि सीमापार संघर्ष वाढला आहे. (Sudan Abyei Clash)
हे ही वाचा :