

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय शिवसेना नेते आदित्य ठाकरे घेणार आहेत. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना विभागप्रमुख यांचे मतही जाणून घेण्यात येणार आहे. त्यामुळे विभागप्रमुखांचे महत्त्व पुन्हा वाढणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पडणार्या आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग बदलले जातात. खुल्या प्रभागात आरक्षण पडल्यास तेथील नगरसेवक अन्य प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी त्या प्रभागात अगोदरपासून महापालिका निवडणुकीची तयारी करणार्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरते. या नाराजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होते. शिवसेनेमध्ये असे काही नगरसेवक आहेत की, त्यांच्या प्रभागात आरक्षण पडले तरी त्यांना अन्य प्रभागातून उमेदवारी दिली जाते.
फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर यांना त्यांच्या लगतच्या प्रभागात उमेदवारी देण्यात आली होती. यावरून तेथील शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवला होता. हा वाद थेट मातोश्रीपर्यंत गेला होता. तरीही किशोरी पेडणेकर यांनाच उमेदवारी देण्यात आली.
विद्यमान नगरसेवक व संभाव्य उमेदवाराचे त्या प्रभागात असलेले राजकीय वजन, जनतेशी असलेला संपर्क, विविध माध्यमातून केलेला विकास व सामाजिक कामे विचारात घेऊन त्या नगरसेवक अथवा कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची की नाही, हे ठरवण्यात येणार आहे. विभागप्रमुख व नगरसेवकांमध्ये अंतर्गत मतभेद असतील तर, उमेदवारी निवडीचा अंतिम निर्णय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नगरसेवकाने सांगितले.
शिवसेनेमधील वरिष्ठ नगरसेवक विभागप्रमुखांचे फारसे ऐकत नाहीत. अनेक नगरसेवक थेट मातोश्रीतून उमेदवारी मिळवतात. यासाठी आमदार, खासदार, एखादा मंत्री यांची मदत घेतली जाते. मात्र या वेळी विभागप्रमुखांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. त्यामुळे विभागप्रमुखांचे वजन वाढणार आहे.