मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तरुणांना करिअरविषयक संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केली.
कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते.
या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात ६ जूनपर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या, आपले ज्ञान व कौशल्य सतत अद्ययावत ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून सतत अद्ययावत ज्ञान मिळविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच कौशल्य विकास विभाग आता स्किलिंग, अपस्किलिंगवर भर देत आहे. या करिअर शिबिरांमधून राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर करण्याची नवनवीन क्षितिजे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.