रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या उत्तर प्रदेशमधील ५ जण समुद्रात बुडाले. यातील एकाचा बुडून मृत्यू झाला तर चौघांना वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज सायंकाळी घडली.
रत्नाकर कल्पनाथ सरोज (वय 24) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर गोलू समरजित सरोज (वय 26),रोहित संजीवन वर्मा (वय 23), कपिल रामशंकर वर्मा (वय 28), मयुर सुधीर मिश्रा (वय 28, सर्व रा.उत्तर प्रदेश, सध्या रा.लोटे खेड,रत्नागिरी ) यांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले.
रविवारी सायंकाळी समुद्रात आंघोळ करण्यासाठी पर्यटक गेले. रत्नाकर सरोज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खात असल्याचे इतरांच्या लक्षात आले. इतर साथीदारांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जीवरक्षक अक्षय माने, ओंकार गवाणकर, आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या घेउन ५ जणांना पाण्याबाहेर काढले. रत्नाकर सरोज यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे मधुकर सरगर आणि सागर गिरीगोसावी यांनी पंचनामा केला.
हेही वाचा