IND vs WI 4th T20 : बरोबरीचे लक्ष्य; भारताचा विंडिजविरूद्ध आज चौथा टी-२० सामना

IND vs WI 4th T20 : बरोबरीचे लक्ष्य; भारताचा विंडिजविरूद्ध आज चौथा टी-२० सामना

लौडरहिल, वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी-20 सामना आज (शनिवारी) होत असून 1-2 असे पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाची नजर या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यावर असेल; परंतु यासाठी त्यांना आघाडीच्या फलंदाजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तर वेस्ट इंडिजचा विचार करता 2016 नंतर त्यांना पहिल्यांदाच भारताविरुद्ध मालिका विजयाची संधी आली असल्याने ते सहजासहजी आपल्या हातातून ही गमावणार नाहीत.

तिसरा सामना जिंकून भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत आव्हान जिवंत राखले असले तरी त्यांच्या मालिका पराभवाचा धोका अजून टळलेला नाही. भारतीय संघ फलंदाजीत ताळमेळ राखण्यात अपयशी ठरत आहे. 'मिस्टर 360 डिग्री' म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव तिसर्‍या सामन्यात आपल्या मूळ रंगात परतलेला दिसला तर नवोदित तिलक वर्माने तीन सामन्यांतील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे; परंतु सलामीची जोडी मात्र सातत्याने अपयशी ठरत आहे. तिसर्‍या सामन्यात इशान किशनला विश्रांती देऊन भारताकडून यशस्वी जैस्वालचे पदार्पण केले; परंतु सलग तिसर्‍यांदा भारतीय सलामी फेल ठरली. जैस्वाल तर त्याच्या पहिल्या षटकांतच एका धावेवर बाद झाला. त्यामुळे या सामन्यातील यशापयश सलामीच्या जोडीवर अवलंबून आहे.

भारत पाच गोलंदाज संघात खेळवतो. त्यात अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर खेळत असल्याने संघात बॅलन्स होतो. त्यानंतर बॅटिंगमध्ये फारसे आश्वासक चेहरे नाहीत. अशा परिस्थितीत भारताला टॉप ऑर्डरकडूनच मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

गोलंदाजीत दुसर्‍या सामन्याला मुकलेल्या कुलदीप यादवने तिसर्‍या सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. या डावखुर्‍या चायनामन गोलंदाजाने 28 धावांत 3 विकेटस् घेतल्या होत्या.

मालिकेतील उरलेले दोन सामने खेळण्यासाठी दोन्ही संघ अमेरिकेत दाखल झाले आहेत. हे सामने फ्लोरिडा येथील लौडरहिलच्या मैदानात होणार आहेत. येथील खेळपट्टी ही बॅटिंग फ्रेंडली समजली जाते. येथे झालेल्या 13 सामन्यांपैकी 11 सामने पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या संघाने जिंकले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news