मंत्रालयातील गर्दीवर वेळापत्रकाची मात्रा | पुढारी

मंत्रालयातील गर्दीवर वेळापत्रकाची मात्रा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर प्रशासनाने वेळापत्रकाची मात्रा शोधली आहे. मंत्र्यांपासून विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना भेटण्यासाठी ठराविक वेळ आणि दिवस निश्चित करून याबाबतची माहिती कार्यालयाबाहेर लावावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा शासन निर्णयच (जीआर) सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला आहे. मंत्रालयात विविध कामे, तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना दुपारनंतर प्रवेश मिळतो. शिवाय, विविध स्तरांवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळाही ठरवुन देण्यात आलेल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात विशेषतः शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयातील गर्दी वाढली आहे. मंत्र्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या गर्दीमुळे प्रशासकीय कामावर ताण पडत असल्याचीही कुजबूज आहे. त्यामुळे या गर्दीला आवरण्यासाठी निश्चित वेळापत्रकानुसार भेटी देण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे मंत्रालयात पुर्वपरवानगी तसेच परवानगीशिवाय भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमावलीचे यापूर्वीचे जीआर अधिक्रमित करून नवा जीआर जारी करण्यात आला आहे.

आजच्या जीआरनुसार मंत्र्यांनी लोकांना भेटण्यासाठी आपल्या सोयीने आठवडा, पंधरवडा, महिना यांतील एखादा ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करावी. त्याबाबतची कल्पना येणाऱ्या द्यावी तसेच भेटीची वेळ दर्शविणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. तर, मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी दुपारी ३ ते ४ ही समान वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी तसेच या वेळेत शक्यतो विभागांतर्गत बैठकांचे आयोजन करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

तर, क्षेत्रीय पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या भेटीसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करुन ठराविक वेळ राखून ठेवावी. ही वेळ दुपारनंतर ठेवण्यात यावी. या राखीव वेळेत शक्यतो बैठकांचे आयोजन करू नये. तसेच, कामानिमित्त करायचे दौरे किंवा भेटी यासाठी आठवडयातील ठराविक दिवस निश्चित करावेत. तसेच, त्याचीही माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावावी. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. दौरे, भेटींमुळे जर क्षेत्रीय अधिकाऱ्यास कार्यालयात उपस्थित रहाणे शक्य नसेल तर अशा प्रसंगी जनतेच्या भेटीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही जीआरमध्ये देण्यात आल्या आहेत.

Back to top button