रायगड : पनवेल मधील महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार | पुढारी

रायगड : पनवेल मधील महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पनवेल विक्रम; बाबर प्रतिनिधी पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याची घटना काल (मंगळवार) उशिरा रात्री घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत स्नेहल पाटील यांच्या पायाला गोळी लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली.

स्नेहल पाटील यांचा पनवेल परिसरात रियल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय आहे, मंगळवारी काम संपल्यानंतर पनवेल वरून उरणला जाताना रात्रीच्या वेळेस त्यांच्यावर गोळाबार करण्यात आला. स्नेहल पाटील या  आपल्या मावस भावासह घराकडे जात होत्या, त्या वेळी काही अज्ञात इसमाने त्यांची गाडी गव्हाण फाटा येथे अडवली आणि  स्नेहल पाटील यांच्या गाडीवर फायरींग सुरू केले. या गोळीबारात स्नेहल पाटील यांच्या पायाला गोळी लागली आहे, त्यांना पुढील उपचारासाठी नेरूळ येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान ही फायरींग व्यावसायीक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान बिल्डरावर गोळीबार करण्याची ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे. यामुळे या घटनेमुळे परिसरात तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button