जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात | पुढारी

जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दुचाकीच्या वादातून येथील २५ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. गोलाणी मार्केटमधील तळघरात सोपान गोविंदा हटकर (२५, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील सोपान हटकर हा आई सरलाबाई यांच्यासोबत वास्तव्याला होता. आई धुणीभांडीचे काम करत होती. तर सोपान हा सेंट्रींगचे काम करत होता. त्याने हप्त्याने दुचाकी खरेदी केली होती. मात्र, दुचाकीचे हप्ते थकल्याने शोरूमचे पथक वसुली करण्यासाठी दुचाकी घेवून जातील या भीतीने दुचाकी ही त्याचा मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतात ठेवलेली होती.

दुचाकी घेण्यासाठी बोलविले अन् घात केला…
२२ मार्च रोजी २०२३ रोजी सोपानचे मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानू यांनी परस्पर सोपानला न सांगता दुचाकी शेतातून घेवून जावून त्याचा वापर करत होते. ही बाब सोपानला माहिती समजली. त्याने फोन करून दुचाकी मला परत कर असे सांगितले. त्यानुसार त्यांनी सोपानला दुचाकी घेण्यासाठी गोलाणी मार्केट येथे घेण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी राहूल भरत भट आणि करण सुभाष सकट हे देखील होते. चौघांमध्ये दुचाकी घेवून जाण्यावरून वाद झाला. रागाच्या भरात चौघांनी चॉपर भोसकून सोपानचा खून करत पळ काढला.

घटनास्थळी पोलिसांची धाव…
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, उमेश भांडारक, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गीते यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आरोपींना केली अटक…
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन खासगी वाहनातून सोपानचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई गोविंदा हटकर (४७) यांच्या फिर्यादीवरुन गोविंदा शांतीलाल झांबरे (रा. नाथवाडा), ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू (रा. कंजरवाडा) राहूल भरत भट (रा. खोटेनगर) आणि करण सुभाष सकट (रा. बी.जे.मार्केट कोंडवाडा, जळगाव) या चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपानची हत्या करणाऱ्या चारही संशयितांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.

हेही वाचा:

Back to top button