छत्रपती संभाजीनगरातून मुख्यमंत्र्यांची धनुष्यबाण यात्रा | पुढारी

छत्रपती संभाजीनगरातून मुख्यमंत्र्यांची धनुष्यबाण यात्रा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने संयुक्त सभांचा कार्यक्रम जारी केला आहे. त्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मविआच्या सभांना उत्तर म्हणून मुख्यमंत्री शिंदे हे लवकरच राज्यभरात धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. ८ किंवा ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून त्याची सुरुवात होणार असल्याची शक्यता शिंदे गटातून व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरातील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत, त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’च्या शुभारंभाची सभा घेतली जाणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री राज ठाकरेंचा सल्ला मानणार का ?

मुख्यमंत्रिपदावर आहात तर जनतेची कामे करा. त्यांच्या मागे सभा घेत फिरू नका. कधी त्यातच गुंतवून टाकतील हे कळणार नाही, असा थेट आणि स्पष्ट सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना शिंदे यांना दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री हा सल्ला मानणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Back to top button