Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द; 'हा तर लोकशाहीवर हल्ला'- काँग्रेसह राज्यातील नेते आक्रमक | पुढारी

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द; 'हा तर लोकशाहीवर हल्ला'- काँग्रेसह राज्यातील नेते आक्रमक

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. राहुल गांधी यांना सूरत येथील न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयानंतर हा तर लोकशाहीवर हल्ला असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला. याचे आज देशभर पडसाद उमटले. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

हे मोदी सरकारचे पाप – नाना पटोले

राहुल गांधींचे लोकसभा सदस्यस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा आयुक्तालयाने घेतलेला हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. मोदी सरकारकडून सुडापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल यांना कोणत्याही सभागृहात बोलून दिले जात नाही. त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी बंधने आणली जात आहेत. मोदी सरकारने सुरतमध्ये राहुल गांधींवर खोटी तक्रार दाखल करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करून मोदी सरकारने पाप केले असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

शाहू- फुले- आंबेडकर विचारांना धक्का देणारा निर्णय – विरोधी पक्षनेते अजित पवार

लोकसभेतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते महम्मद फैजल यांचे देखील लोकसभा सदस्यत्व रद्द करत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकशाहीतील विविध पक्षांची राजकिय भूमिका वेगळी असू शकते. वैचारिक मतभेद असू शकतात. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. लोकशाहीला धक्का देणारा आहे. हा निर्णय शाहू-फुले- आंबेडकर विचारांच्या विरोधात असल्याचे मत देखील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

राज्यकर्ते असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणे ही आपल्या देशाची परंपरा आहे. या परंपरेला तिलांजली दिल्याचे या निर्णयाने समोर आले आहे. राज्यकर्ते कोणीही असो, हे सर्व जनता बघत आहे त्यामुळे याचे उत्तर देशातील जनता देईल. जे काही घडले आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

हा तर लोकशाहीवरील हल्ला – बाळासाहेब थोरात

राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करणे, हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भाजपा राहुल गांधींना खाबरली असल्याचे हा निर्णय सांगत आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील जनतेची मने जोडण्याचे प्रयत्न केले आहेत. राहुल यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र आणि अदानी यांच्या संबंधांवर स्पष्टीकरण मागितले, पण मोदी यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. लोकसभेत अदानी समुहाची चौकशी करण्यासाठी समिती मागणी केली. परंतु यावर कोणतीच कार्य केले नाही. राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

 व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा दाबला जातोय – जयंत पाटील

हा निर्णय अत्यंत दुर्दवी आहे. राष्ट्रवादीचे लक्षव्दिपचे खासदार फैजल यांची खासदारकी देखील अशीच प्रकारे रद्द करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यांना न्याय दिल्याने त्याची खासदारकी रद्द होण्यापासून वाचली. पण राहुल गांधींच्या बाबतीत सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला. त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ देखील मिळाला नाही. या सरकारला लोकसभेतील विरोधकांची खासदारकी रद्द करण्याची या सरकारला घाई झाली आहे. सत्तेत बसणाऱ्या लोकांकडूनच लोकशाही विरोधी काम केले जात आहे, व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा सत्तेतील सरकारकडून दाबला जात आहे. पण विरोधकांना चिरडण्याचा ही प्रथा चुकीची असल्याचे मत देखील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त करत भाजपच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

 हा निर्णय द्वेष भावनेतून -ॲड. प्रकाश आंबेडकर

सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केलेले आहे ते अपील करणार आहेत. असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का? याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर, सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत असल्याचे मत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

देशातील जनता हुकूमशाही सहन करणार नाही – मल्लिकार्जुन खरगे

मोदी सरकार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला घाबरली आहे. त्यामुळेच सरकारने राहुल गांधी यांच्या लोकसभा सदस्यत्त्व रद्द केले आहे. अदानी-हिंडेनबर्ग समुहासंर्भात राहुल गांधी यांनी मागणी केलेल्या समितीला मोदी सरकारचा विरोध आहे. लोकशाही संपवण्यासाठीच राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सत्तेतील सरकारला खरे बोलणाऱ्यांचे तोंड बंद करायचे आहे. परंतु देशातील जनता हुकूमशाही सहन करणार नाही. आम्हाला जेल मध्ये जावे लागले तरी आम्ही लढत राहू, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आहे.

 

 

Back to top button