पुढारी ऑनलाईन: TikTok वर घातलेल्या बंदीला भारतात तीन वर्षांहूनचा अधिक काळ लोटला आहे. परंतु, बंदी घातल्यानंतरही TikTok ला अजूनही भारतीय वापरकर्त्यांच्या डेटाचा ऍक्सेस आहे. एका नव्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या अहवालात असा दावा केला आहे की, भारतीय कर्मचारी आणि टिकटॉकच्या वापरकर्त्यांचा डेटा आजही पाहिला जाऊ शकतो. TikTok ची मूळ कंपनी ByteDance कडे या डेटाचा ऍक्सेस आहे. TikTok चे महिन्याला भारतात 150 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते होते.
फोर्ब्सला टिकटॉकच्या एका कर्मचाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आहे. या कर्मचाऱ्याने फोर्ब्सला सांगितले की, बंदी असतानाही भारतीयांना त्यांचा किती डेटा चीनकडे आहे, याची जाणीव आहे असे मला वाटत नाही. चीन अजूनही सेलिब्रेटींच्या आणि दैनंदिन वापरकर्त्यांच्या डेटाचे विश्लेषण करू शकतो.
आज सध्याच्या घडीला टिकटॉक भारतात उपलब्ध नाही. परंतु त्याची मूळ कंपनी ByteDance चे चीन, अमेरिका आणि रशियासह जगभरात 110,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. हा डेटा विशिष्ट वयोगटातील वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. टिकटॉकने फोर्ब्सचा हा दावा फेटाळला आहे.
या वर्षीच्या सुरुवातीलाच टिकटॉकने भारतातील चाळीस कर्मचाऱ्यांना वेतन देणे थांबवले आहे. २०२०-२१ मध्ये भारताने जवळपास ३०० चायनीज ऍप्सवर बंदी घातली आहे. ज्यामध्ये WeChat, Shareit, Helo, Likee, UC News, Bigo Live आणि UC Browser यांचा समावेश होता.