बागेश्वर होणार ‘मुंबईवाले’; विरोधकांना दिले आव्हान; मुंबई, ठाण्यात पुन्हा-पुन्हा येणार | पुढारी

बागेश्वर होणार 'मुंबईवाले'; विरोधकांना दिले आव्हान; मुंबई, ठाण्यात पुन्हा-पुन्हा येणार

भाईंदर / मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा वादग्रस्त दरबार मीरारोड येथील सेंट्रल पार्कमध्ये शनिवारपासून सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गर्दी उसळून सुरक्षाव्यवस्था कोलमडली. रविवारी दरबाराच्या अखेरच्या दिवशी गर्दी विक्रमी उसळण्याची चिन्हे आहेत. दरबाराच्या पहिल्याच दिवशी बागेश्वर महाराजांनी आपण आता मुंबईत पुन्हा येणार असून, मुंबईवालेच होणार असल्याचे संकेत आपल्या विरोधकांना दिले.

आ. गीता भरत जैन यांनी आपल्या सासूच्या नावे असलेल्या श्रीमती शांताबेन मिठालाल जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून १८ व १९ मार्च असे दोन दिवस हा दरबार भरवला आहे. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, या दरबाराच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांनी बागेश्वर सरकारांची भेट घेतली व मुख्यमंत्र्यांच्या घरी पायधूळ झाडण्याचे निमंत्रण दिले. ते बागेश्वरांनी स्वीकारले नाही आणि नाकारलेही नाही. हे बुवा इतकेच म्हणाले की, मारूती घेऊन जाईल तिकडेच मी जातो. ठाण्यामध्ये पुढील आठवड्यात कुणा त्रिपाठींकडे भूमीपूजन होत असल्याची बातमीही बागेश्वर महाराजांनी दिली. आपण लवकरच मुंबईवाले होणार. जिवंत असेपर्यंत पुन्हा पुन्हा मुंबई, ठाण्यात येत राहणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. दरबार वादग्रस्त या दरबारावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेतले जात आहेत. त्यात आता मीरारोड पोलिसांनी ट्रस्ट ऐवजी आयोजक कमिटी सदस्य तथा माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांना नोटीस पाठवून कोणत्याही धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबत नोटीस बजावली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरबाराच्या आयोजनावर आक्षेप घेत महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना स्थान नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. अंनिसने मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन धीरेंद्र यांच्या बुवाबाजीवर आक्षेप घेतला. यापूर्वी देखील अंनिसने नागपुरात झालेल्या त्यांच्या दिव्य दरबारात कायद्याचे वारंवार उल्लंघन झाल्याने पोलिसांत तक्रार केली होती. डॉक्टरची पदवी नसलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर उपचार करण्याचा दावा केला तरी ते कायद्याचे उल्लंघन असल्याचा मुद्दा अंनिसने उपस्थित केला होता. तसेच त्यांनी संत तुकाराम महाराजांवर वक्तव्य केल्याने वारकरी संप्रदायाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक मनसेने विरोध केला तर संदीप पाटील या नाना पटोले समर्थकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी बुवाबाजीला विरोध करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. आ. गिता जैन यांनी दरबारच्या आयोजनाप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ख्रिस्ती धर्मगुरूंबद्दल वक्तव्य केल्याने शहरातील ख्रिस्ती धार्मियांनी गिता जैन यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

प्रवेशद्वार तोडून कार्यक्रमात प्रवेश

भक्तांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. महत्वाच्या व्यक्तींसाठी पास वितरीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १ लाख लोक उपस्थित राहतील, त्याच्या नियोजनासाठी ३०० खाजगी सुरक्षा रक्षक तसेच सुमारे १५० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आ. गिता जैन यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र कार्यक्रमावेळी अपेक्षेपेक्षा अधिक लोक आल्याने कार्यक्रमात गर्दी झाल्याने तिला आवरणे हाताबाहेरचे झाले. लोकांनी काही ठिकाणचे प्रवेशद्वार तोडून कार्यक्रमात प्रवेश केला.

Back to top button