बावनकुळेंच्या 'त्या' विधानावरून वादंग | पुढारी

बावनकुळेंच्या 'त्या' विधानावरून वादंग

मुंबई/नागपूर : पुढारी वृत्तसेवा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवेल, शिंदे गटाकडे ५० च आमदार असल्याचे विधान केल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी सारवासारव करतानाच बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, भाजपची सर्व जागा लढवण्याची तयारी शिवसेनेला फायद्याचीच आहे. त्यांचे हे विधानही वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

बावनकुळे यांच्या विधानाला अतिउत्साही ठरवत, कोण कुठला नेता काही घोषणा करत असेल त्याला काही महत्त्व नाही, असे सुनावत आ. संजय गायकवाड म्हणाले, आमची युती ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस सर्वांसोबतचा विषय आहे.. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही १२५ ते १३० च्या खाली जागा लढणार नाही. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, बावनकुळेंना जेवढे अधिकार आहेत, तेवढेच त्यांनी बोलायला हवे.

महाविकास आघाडीने शिंदे गटाला भविष्य नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजपा सध्या ४८ जागा शिंदे गटाला सोडायला तयार असली तरी पुढच्या वर्षभरात शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही. एकटा भाजपा २८८ जागा लढवेल. मित्रपक्ष असो किंवा विरोधक त्यांना फोडणे आणि नामोहरम करण्याचाच भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. शिंदे गटाचे अस्तित्व जरी राहिले, तरी सर्वेक्षणाच्या नावाखाली निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ५-७ जागा दिल्या जातील. उर्वरित जागा मविआ विरुद्ध भाजपा अशीच लढत होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे यांची सध्या नवीन सुरुवात आहे, त्यांचे चांगले व्हावे ही आमची सदिच्छा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. खा. संजय राऊत म्हणाले, ज्या ४८ जागा बावनकुळे यांनी देऊ केल्या तेवढीच लायकी शिंदे गटाची आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत संभाव्य जागावाटपाबाबत अद्याप कुठलीच चर्चा झालेली नाही, वरिष्ठ नेतेच तो निर्णय घेतील. मात्र, भाजपने सर्व जागांसाठी केलेल्या तयारीचा फायदा शिवसेनेला व त्यांनी केलेल्या तयारीचा फायदा भाजपला होईल, असे घूमजाव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केले. आपली सोयीची क्लिप वापरली गेल्याचा आरोप केला.

Back to top button