विधान भवनातून : सारे काही टीआरपीसाठी! ‘सिंहासन’ सिनेमाची आठवण !! | पुढारी

विधान भवनातून : सारे काही टीआरपीसाठी! 'सिंहासन' सिनेमाची आठवण !!

उदय तानपाठक
शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असल्याने आज विधानभवनात या सुनावणीबाबत उत्सुकता होती. आमदार-मंत्री गटागटाने या खटल्याबाबत चर्चा करीत होते. पत्रकार भेटला की, त्याला याबद्दल मत विचारले जात होते. आता पत्रकार याबद्दल काय सांगणार कप्पाळ? पण विचारणाऱ्याचे समाधान ‘जो जे वांछिल तो ते’ सांगून वेळ मारून नेली जात होती. उद्या निकाल लागला तर सरकार पडणारच! लिहून घ्या, असे सांगणारे नेते जसे होते, तसेच सरकारला काहीही होणार नाही. कुणी काळजी करू नका, असे छातीठोकपणे सांगणारेही होते.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप सुरू केला असल्याने विधानभवनात आज चिंतेचे वातावरण होते. सरकारच्या कामकाजावर परिणाम होतो की काय. अशी भीती व्यक्त होत होती. यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी दाखवली होती. त्यानुसार आज विधानभवनात एक बैठक झाली. प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात आणि आरोग्य संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर सरकार जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक असल्याचे सांगत शिक्षकांचे नेते संभाजी थोरात यांनी संपातून माघार घेतल्याचे जाहीर केले. खूप वर्षांपूर्वी ‘सिंहासन’ नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. त्यात मुख्यमंत्री बंगल्याबाहेर उपोषणाला बसलेल्या गुरुजींना मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असलेले अरुण सरनाईक स्वतः च्या बंगल्यात घेऊन जातात, तो प्रसंग यानिमित्ताने आठवला, इतकेच! विधानभवनाच्या पायऱ्यांवर रोजच आंदोलने होत असतात. मंगळवारी मात्र बाळापूर अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी वेगळाच प्रकार केला. त्यांच्या मतदारसंघातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी देशमुख यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर धरणे धरले. पुतळ्याजवळ असे आंदोलन करण्याची प्रथा नाही.

आमदार देशमुख यांना याची कल्पना वारंवार देऊनही ते हटले नाहीत. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही देशमुख यांना आपल्या दालनात बोलावले. मात्र, देशमुख यांनी तेदेखील जुमानले नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देशमुख यांची मागणी मान्य केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणारे आणि नंतर जबरदस्तीने नेल्याचा बहाणा करून पळून आल्याचा दावा करणारे तेच हे नितीन देशमुख ! आज त्यांनी बराच टीआरपी घेतला. हे खरे!

Back to top button