प्राथमिक शिक्षक, आरोग्य संघटना संपातून बाहेर; आजपासून कामावर परतणार | पुढारी

प्राथमिक शिक्षक, आरोग्य संघटना संपातून बाहेर; आजपासून कामावर परतणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजना राबविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर केली आहे. जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी सरकारला वेळ देण्यास संघाची तयारी असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर आरोग्य संघटनांनीही या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात तसेच आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संघटनांना शासनाची भूमिका समजावून सांगितली.

जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी शासन सकारात्मक असून शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे तत्त्व सरकार म्हणून आपल्याला मान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याची गरज त्यांनी या संघटनांना समजावून सांगितली. ही समिती येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असून या समितीमध्ये सचिव दर्जाचे प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक संघटना, आरोग्य संघटनेचे पदाधिकारी देखील समाविष्ट असतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

• कालबद्ध कालावधीत समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार असून त्यानंतर जुनी पेन्शन योजना जाहीर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
• त्यानंतर उद्यापासून राज्यातील प्राथमिक शिक्षक आणि वैद्यकीय कर्मचारी सेवेत दाखल होतील असे या संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी जाहीर केले.

Back to top button