पुणे, पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीमार्गांचे उद्घाटन पुढील वर्षाच्या प्रारंभी करण्यात येईल. उन्हाळा संपेपर्यंत दोन्ही मार्गांचे काम सुमारे 70 टक्के होईल आणि डिसेंबरपर्यंत मार्ग बांधून पूर्ण होतील, असे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
दोन्ही पालखीमार्गांच्या कामाची त्यांनी हेलिकॉप्टरमधून शनिवारी (दि. ११) पाहणी केली. त्यांच्यासमवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हडपसरपासून मोहोळपर्यंत विकसित करण्यात येत आहे. त्याची लांबी 234 किलोमीटर आहे. या प्रकल्पामध्ये दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखीमार्ग करण्यात येत आहे. सासवड, निरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर येथे बाह्यवळण रस्ते बांधण्यात येत आहेत. या मार्गावर बारा ठिकाणी पालखी स्थळ आहेत.
संत तुकाराम महाराज पालखीमार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस येथून बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे तोंडले बोंडलेपर्यंत विकसित केला जात आहे. त्याची लांबी 130 किलोमीटर आहे. बारामती, बावडा, अकलूज, श्रीपूर, बोरगाव या ठिकाणी बाह्यवळण मार्ग करण्यात येतील. या मार्गावर अकरा ठिकाणी पालखीस्थळ आहेत.
दोन्ही पालखीमार्गांवर दुतर्फा वृक्षारोपण केले आहे. महामार्गावर आवश्यक तेथे महाराष्ट्रातील संत-महंतांचे शिल्प, भित्तिचित्र, अभंगवाणी आदी सुविधा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत रस्त्याच्या कडेला 18 हजार 838, तर रस्त्याच्या मध्यभागी 57 हजार 173 वृक्ष लावण्यात आले आहेत. वड, पिंपळ, लिंब, जांभूळ, उंबर अशा वृक्षांचा यात समावेश आहे. 'ज्ञानेश्वरी'मध्ये ज्या वृक्षांचे वर्णन केले ते वृक्ष लावण्यात आले आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले की, मोहोळ ते वाखरी यादरम्यान 91 टक्के, वाखरी ते खुडूस 97 टक्के, तर खुडूस ते धर्मपुरी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धर्मपुरी ते लोणंद 41 टक्के, तर लोणंद ते दिवेघाट यादरम्यान 20 टक्के काम झाले आहे. दिवे घाट ते हडपसर या मार्गाच्या निविदा काढण्यात येत आहेत. प्रत्येक लहान गावच्या ठिकाणी देखील स्वतंत्र भुयारी मार्ग केलेले आहेत. संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरही पाटण ते बारामती यादरम्यान 85 टक्के काम झाले आहे, तर उर्वरीत दोन ठिकाणी 40 टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे. पुढील तीन महिन्यांत 70 टक्के काम होईल, तर वर्षअखेरीपर्यंत कामे पूर्ण होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पालखीमार्गाच्या कामांचे भूमिपूजन झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये, तर संत तुकाराम महाराज पालखीमार्गासाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. पंढरपूर, देहू, आळंदी ही तीर्थक्षेत्रे यामुळे जोडली जात आहेत. लाखो वारकरी या मार्गाने जात असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र साडेतीन मीटर रुंदीचा मार्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या मदतीने तेथे विविध प्रकारच्या सोयी करण्यात येतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर तेथील गाळ आणि वाळू महामार्गासाठी वापरण्यास द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. गाळ काढल्यास त्याचा रस्त्याला उपयोग होईल तसेच धरणातील पाणीसाठ्याची क्षमताही वाढेल, असे त्यांनी नमूद केले.