जळगावात राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार विजयी | पुढारी

जळगावात राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार विजयी

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. मात्र संजय पवार यांनी बंडखोरी करत, उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीत फूट पडल्याने संजय पवार विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेतून राष्ट्रवादीची सत्ता हातून गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने आज निवडणूक झाली आहे. बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता होती, महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्ष पद राहणार असा फॉर्म्युला ठरला होता. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऍड रवींद्रभैय्या पाटील, संजय पवार, डॉ.सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. असे असतानाही संजय पवार यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. त्यांना भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मतदान केल्यामुळे ते विजयी झाले आहेत.

उपाध्यक्षपदी अमोल पाटील बिनविरोध…

उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत अमोल पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड झाली.

Back to top button