कोकणात काजू, आंब्याचे, विदर्भात गहू, संत्र्याचे नुकसान | पुढारी

कोकणात काजू, आंब्याचे, विदर्भात गहू, संत्र्याचे नुकसान

कोल्हापूर : टीम पुढारी : कोकणात वादळी वाऱ्यामुळे काजू व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात काजू व आंब्याची कोवळी फळे गळून पडली आहेत. अलिबागच्या औषधी असलेल्या पांढरा कांद्याचे यंदा चांगले उत्पन्न आले असताना होळीला झालेल्या अवेळी पावसाने नुकसान झाले आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात धुलिवंदनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास विविध भागांत अवकाळी पाऊस, हवेमुळे विविध ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार वादळी वाऱ्याने काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काजू व आंब्याची कोवळी फळे गळून पडली आहेत. हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गेले दोन तीन दिवस

वैभववाडी तालुक्यात रात्री सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्याने काजू व आंबा बागायतींना अक्षरशः झोडपून काढले आहे. आंबा व काजूची कोवळ्या फळांची झाडांखाली रास पडलेली पाहायला मिळत आहे. आंबा व काजू झाडांच्या या वादळाने फांद्या मोडून पडल्या आहेत. तर काही झाडे या वादळाने मुरगटून टाकली आहेत. अतिशय कष्टाने उभारलेल्या बागेतील उत्पन्न घेण्याच्या वेळेस आलेल्या या संकटाने शेतकरी हतलब झाला आहे.

पांढऱ्या कांद्याचे नुकसान

रायगड : अलिबागच्या गुणकारी व औषधी असलेल्या पांढरा कांद्याचे यंदा चांगले उत्पन्न आले असताना होळीला झालेल्या अवेळी पावसाने नुकसान झाले आहे. शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने धोक्यात आला आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यास काढलेला तसेच शेतात असलेल्या पांढऱ्या सोन्याचे पीक वाया जाण्याचे संकट शेतकऱ्या समोर उभे ठाकले आहे. ठाणे जिल्ह्यातील वसई आणि नाशिक जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु, अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा इतर ठिकाणी होणाऱ्या कांद्यापेक्षा वेगळा आहे. इतर ठिकाणी होणारा पांढरा कांदा तिखट असतो. त्या तुलनेत अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा कमी तिखट असतो. या कांद्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान

वर्धा : जिल्ह्यात धुलिवंदनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास विविध भागांत अवकाळी पाऊस, हवेमुळे विविध ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देवळी तसेच कारंजा (घाडगे) तालुक्याला याचा जबर फटका बसला आहे. अवकाळी पावसाने संत्रा, गहू, चणा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्र्यांची फळगळ झाली तर गहू जमीनदोस्त झाला. चण्याच्या गंजी काही ठिकाणी भिजल्या होत्या. कारंजा (घाडगे) तालुक्यात संत्र्याला जास्त फटका बसला. देवळी तालुक्यातही काही गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. देवळी तालुक्यात सहा गावांत १८.८० हेक्टरवर तर कारंजा तालुक्यात २३ गावांत ६७ हेक्टर असे २९ गावांत ८५.८ हेक्टरवर नुकसानीचा अंदाज आहे. नुकसानीच्या अंतिम सर्वेक्षणाला प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Back to top button