आदित्य ठाकरे म्हणाले, २०२८ पर्यंत बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक | पुढारी

आदित्य ठाकरे म्हणाले, २०२८ पर्यंत बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहराला प्रदूषण मुक्त करून पर्यावरण स्नेही बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून 2028 पर्यंत मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस विद्युत ऊर्जेवर धावणार्‍या म्हणजेच इलेक्ट्रीक असतील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन आणि ई-बस मिशन या तीनही उपक्रमांच्या सामंजस्य करारांवर महापालिका मुख्यालयात स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. वातावरण बदल सक्षमतेसाठी चळवळ उभी करताना त्यात महिलांचे नेतृत्व उभे करण्यासाठी देखील करार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

डबल डेकर बस बेस्टमधून हद्दपार होत असतानाच बेस्टमध्ये येणार्‍या काळात इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार असल्याचेही आदित्य यांनी स्पष्ट केले.

शासनाने 2025 पर्यंत 15 टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर महानगरपालिकेने 2023 पर्यंत 50 टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button