ChatGPT ने अमेरिकेत मेडिकलची परीक्षा केली पास, पण भारतात UPSC मध्ये झाले नापास | पुढारी

ChatGPT ने अमेरिकेत मेडिकलची परीक्षा केली पास, पण भारतात UPSC मध्ये झाले नापास

पुढारी ऑनलाईन: OpenAI चा चॅटबॉट ChatGPT कुणासाठी प्रेमपत्र, तर कुणाचा रजा अर्जही लिहित आहे. ChatGPT शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नोट्स बनवण्याचे कामही करत आहे. आता चॅटजीपीटी परीक्षेसही बसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी ChatGPT ने अमेरिकेत वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली आहे, मात्र, ChatGPT ला भारतात काही परीक्षेत यश आले नाही.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत चॅटजीपीटी फेल झाले आहे. ही परीक्षा अॅनालिटिका इंडिया मॅगझिनने घेतली होती. चाचणी दरम्यान ChatGPT ला UPSC 2022 प्रिलिम्स पेपर 1, सेट A मधून 100 प्रश्न विचारण्यात आले, त्यापैकी ChatGPT ने फक्त 54 प्रश्नांची उत्तरे दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेनंतर जनरल कॅटेगिरीसाठी ८७. ५४ टक्के एवढे कट ऑफ होते. अशा परिस्थितीत ChatGPT 2022 च्या UPSC परीक्षेत नापास झाले असते. या परीक्षेत भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास, पर्यावरणशास्त्र, विज्ञान ते चालू घडामोडी, सामाजिक विकास आणि राजकारणापर्यंतचे प्रश्न ChatGPT वरून विचारण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ChatGPT वरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेटवर आधीच उपलब्ध आहेत.

अफगाणिस्तान या देशाची सीमा अजरबैजान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यामधील कोणत्या देशांशी आहे, असे विचारले असता बॉटने पहिल्या चार देशांची नावे दिली. परंतु, बरोबर उत्तर ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान होते. ChatGPT नेही अनेक प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली.

Back to top button