महाराष्ट्रात पाच वर्षांत एक कोटी वाहनांची भर! | पुढारी

महाराष्ट्रात पाच वर्षांत एक कोटी वाहनांची भर!

मुंबई ; चेतन ननावरे : महाराष्ट्रात धावणार्‍या वाहनांनी सप्टेंबर अखेरीस 3 कोटींचा आकडा पार केला. यात खासगी वाहनांची संख्या पावणे तीन कोटी तर व्यवसायिक 25 लाख वाहनांचा समावेश आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे 2017च्या सुरुवातीस राज्यातील एकूण वाहनांच्या संख्येने 2 कोटींचा आकडा गाठला होता. मात्र व्यवसायिक आणि खासगी वापरासाठी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याने पाच वर्षांत त्यात आणखी 1 कोटी वाहनांची भर पडली.

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नोंदणीकृत वाहनांची संख्या 3 कोटी 1 लाख 71 हजारांवर पोहचली. यात 2 कोटी 15 लाख 63 हजार 717 दुचाकींचा समावेश आहे. याउलट खासगी चारचाकींची संख्या 50 लाख 11 हजार 886 वर पोचली.

ग्रामीणसह शहरी भागात मोपेडचा वापर अधिक होत आहे. आजघडीला राज्यात 2 लाख 29 हजार 193 मोपेडची नोंद आहे. शेतीमध्ये वापरले जाणार्‍या ट्रॅक्टरच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. तुर्त राज्यात 5 लाख 62 हजार 609 शेतीच्या वापराचे ट्रॅक्टर आहेत. सोबतच परिवहन विभागाच्या नोंदित ट्रेलरची संख्या 1 लाख 02 हजार 434 वर गेली आहे.

राज्यातील प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षांची संख्या 7 लाख 40 हजारापर्यंत पोहचली. तर चारचाकी प्रवासी वाहतूक वाहनांची संख्या 2 लाख 90 हजारांच्या घरात गेली. माल वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या 12 लाख 45 हजार 545 झाली असून 75 हजार तीनचाकी माल वाहतूक रिक्षांची नोंद आहे.

इंधननिहाय वाहनांची संख्या

इंधन प्रकार         वाहन संख्या
पेट्रोल                 2,44,46,007
डिझेल                41,92,182
पेट्रोल-सीएनजी    9,91,456
पेट्रोल-एलपीजी    2,10,810
सीएनजी             49,129
इलेक्ट्रिक           43,863
पेट्रोल-हायब्रिड   39,662
डिझेल-हायब्रिड  35,394
इतर                 1,58,151

Back to top button