आनंद आश्रमातून सेनेचा कारभार; शिवसेना भवनसह पक्षनिधीवर कोणताही दावा नाही; शिंदे गटाने केले स्पष्ट | पुढारी

आनंद आश्रमातून सेनेचा कारभार; शिवसेना भवनसह पक्षनिधीवर कोणताही दावा नाही; शिंदे गटाने केले स्पष्ट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कारभारही आता ठाण्यातून चालणार आहे. पक्ष आणि चिन्हाचा ताबा शिंदे गटाकडे आला असला तरी आजवरच्या शिवसेनेच्या प्रवासाची साक्षीदार असणाऱ्या शिवसेना भवनाची वास्तू मात्र ठाकरे गटाकडे राहणार आहे. त्यामुळे दिवंगत आनंद दिघे यांचा वारसा लाभलेल्या आनंद आश्रमातून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. पक्षाच्या नव्या नियुक्त्यांचे आदेश याच मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यासही सुरूवात झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुळ पक्ष म्हणून मान्यता दिल्यानंतर ठाकरेंकडून शिवसेना भवनही जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेना भवनाची वास्तु ही शिवाई ट्रस्टच्या मालकीची असल्याने ती ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना भवन, पक्षनिधी अथवा अन्य संपत्तीवर दावा करण्याचा आमचा इरादा नसल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासाठी आनंद आश्रमाला पसंती दिली आहे.

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरील आनंद मठातून आपला कारभार चालविला होता. याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य असायचे. एका अर्थाने ठाण्यातील शिवसेनेचे सत्ताकेंद्र अशीच या वास्तुची ख्याती होती. एकनाथ शिंदेंसह ठाण्यातील आजच्या अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवातही इथेच झाली.

…तरीही दादरचे वेध

तुर्त आनंद आश्रमात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय थाटले असले तरी दादर भागात प्रशस्त कार्यालय थाटण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू आहेत. वेगळा गट बनविल्यापासून दादरमध्ये मुख्यालय सुरू करण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न सुरू होते. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी जागेचा शोध घेत असल्याचेही तेंव्हा जाहीर केले होते. आता मुळ शिवसेनेचा दर्जा मिळाल्याने मुख्यालयाचा शोध जोर धरू लागला आहे. माजी आमदार किरण पावसकर यांनी याबाबतची जबाबदारी उचलल्याची माहिती आहे.

Back to top button