राज्यातील ३५४ पोलीस निरीक्षक होणार एसीपी | पुढारी

राज्यातील ३५४ पोलीस निरीक्षक होणार एसीपी

नवी मुंबई; राजेंद्र पाटील : राज्य पोलीस दलात नोव्हेंबर २०२२ पासून गृहखात्याने पदोन्नती प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने २०२२-२३ मध्ये ३५४ पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीसाठी निवडसूची तयार केली आहे. या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी एक कालबध्द कार्यक्रम ९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आला आहे. निवडसूचीतील अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक कार्यालयात दिलेल्या तारखांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या अधिकाऱ्यांकडून तीन पसंतीची ठिकाणे घटकप्रमुखांमार्फत पाठवली जाणार आहेत. निवडसूचीतील अधिकाऱ्यांविरुध्द सुरू असलेली विभागीय चौकशी तातडीने पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय कारणे दाखवा नोटीस अथवा कसुरी अहवाल प्रलंबित असल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचेही घटकप्रमुखांना सांगण्यात आले. या अधिकाऱ्यांचे सेवापुस्तक पडताळून शिक्षांची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे की नाही ते तपासून अहवाल पाठवण्याचे निर्देश अपर पो- लीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी ३० जानेवारी रोजी दिले आहेत. या पदोन्नतीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा पोलीस निरीक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाने ऑक्टोबर २०२२ पासून १९ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदावर बढती दिली. त्यानंतर २०२१-२२ या वर्षीची निवडसूची तयार केली. त्यामध्ये सहा महसूल विभागांसह मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर येथील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या १७५ पोलीस निरीक्षकांची यादी जाहीर केली. नोव्हेंबर अखेर महासंचालक कार्यालयाने घटकप्रमुखांकडून मागवलेल्या माहितीत सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक दर्जाची २६४ पदे रिक्त असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मेअखेरपर्यंत आणखी काही अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर स. पोलीस आयुक्त पदे रिक्त होणार आहेत.

यामुळे जातात पोलीस अधिकारी मॅटकडे

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पदोन्नतीची निवड सूची तयार केली जाते. निवड सूचीतील अधिकाऱ्यांची माहिती पाठविताना काही घटक प्रमुख (एसपी, सीपी, आयजी, स्पेशल आयजी) अपुरी माहिती पाठवणे, उशिराने पाठवणे, कधीतर पाठवतच नाहीत असे प्रकार करतात.

अशा अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याचशा अधिकाऱ्यांची प्रकरणे खुली ठेवावी लागतात. निवड सूचीवर पदोन्नती न मिळाल्यामुळे ते अधिकारी मॅटमध्ये दावे दाखल करतात. त्यामुळे मॅटच्या निर्णयानुसार पदोन्नतीचे आदेश देण्याची वेळ आली आहे.

पदोन्नतीतील अधिकाऱ्यांची यादी

मुंबईतील ९०, ठाणे २६, नवी मुंबई १८, मिर- भाईंदर ९, पालघर ४, पुणे, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण २०, नाशिक शहर, ग्रामीण १३, कोल्हापूर ५ अशी आकडेवारी पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली.

Back to top button