Pm Modi Vs Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आरोपांवर नरेंद्र मोदी उत्तर देणार? वाचा सविस्तर | पुढारी

Pm Modi Vs Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आरोपांवर नरेंद्र मोदी उत्तर देणार? वाचा सविस्तर

पुढारी ऑनलाईन: संसद सदनात मागील काही दिवसांपासून अदानी प्रकरणावरुन गदारोळ सुरु आहे. विरोधी पक्षाने अदानींचा मुद्दा लावून धरत सत्ताधारी मोदी सरकारला (Pm Modi Vs Rahul Gandhi) धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल संसद सभागृहात अदानी, मोदींवर अनेक प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यामुळे आज संसद सभागृहात मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मत मांडणार असून, दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांवर काय उत्तर देणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्‍लाबोल (Pm Modi Vs Rahul Gandhi) केला. अदानी समूहावर झालेल्या आरोपांची जेपीसीमार्फत अथवा निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी सभागृहात अध्यक्षांना केली. राहुल गांधींच्या या मागणीवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. या पार्श्वभूमीवर अदानींचाच मुद्दा केंद्रीभूत करीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला.

अदानी श्रीमंतांच्‍या यादीत दुसर्‍या स्‍थानी कसे आले : राहुल गांधींचा सवाल

लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्‍हणाले, “२०१४ मध्‍ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी ६०९ क्रमांकावर होते. नेमकी काय जादू झाली माहित नाही अदानी दुसऱ्या क्रमांकावर आले. लोकांनी विचारले की हे यश कसे मिळाले? अदानी आणि नरेंद्र मोदी (Pm Modi Vs Rahul Gandhi)  यांचे नाते हे अनेक वर्षांपूर्वीपासून सुरु झाले होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्‍यमंत्री होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्‍यानंतर अदानी दिल्लीत पोहोचले आणि यानंतर त्‍यांची जादू सुरू झाली.”

एलआयसी’चा पैसा अदानीच्या कंपन्यांतच का? : राहुल गांधी

पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात आणि त्यानंतर जादू होउन स्टेट बॅंक अदानी समुहाला एक अब्ज डाॅलर्सचे कर्ज देते. त्यानंतर पंतप्रधान बांगलादेशला जातात आणि 1500 मेगावॅट क्षमतेचा तिथला प्रकल्प अदानीला मिळतो. मोदी इस्त्रायलला जातात आणि लगेच संरक्षण विषयक साहित्य निर्मितीच्या कंपन्या अदानी स्थापन करतात. विमानतळ संचलन क्षेत्रात अदानींची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. मुंबईतील विमानतळाचे काम पूर्वी जीव्हीके कंपनीकडे होते. त्या कंपनीला तपास संस्थांचा धाक दाखवून बाहेर काढण्यात आले आणि हे विमानतळ अदानीकडे सुपूर्द करण्यात आले. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील, असे सांगतानाच एलआयसीचा पैसा अदानीच्या कंपन्यांत का गुंतवण्यात आला? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

अजित डोवाल यांनी अग्निवीर योजना लष्करावर लादली

भारत जोडो यात्रेदरम्यान मला देशातील विविध राज्‍यांमध्‍ये अनेक तरुण भेटले. त्‍यांनी अग्निवीर योजनेवर नाराजी व्‍यक्‍त केली. पूर्वी भारतीय सैन्‍यदलात १५ वर्षे नोकरीसह पेन्शन मिळत असे, मात्र आता चार वर्षांनी नोकरीवरून काढून टाकले जाईल, अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. यासंदर्भात मी काही वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना भेटलो. त्‍यांनी सांगितले की, अग्निवीर योजना लष्कराच्या बाजूने आलेली नाही. ती लादण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी अग्निवीर योजना लष्करावर लादली यामध्ये आरएसएसचाही हात आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Back to top button